बेगमपूर-माचणूर भीमा नदीवरील पुलाची बाजू खचल्यामुळे स्थिती धोकादायक

अश्पाक बागवान 
Sunday, 18 October 2020

भीमेला आलेल्या महापूरामुळे बेगमपूर माचणूर दरम्यान नदीवरील पूल दोन दिवसाहून अधिक काळ पाण्याखाली होता. नदीपात्रातील पाण्याच्या प्रचंड वेगामुळे पुलावरील दोन्ही बाजूने लोखंडी संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. पुलावरील डांबरीकरणाचा भाग उखडून निघाला आहे. माचणूरच्या गावच्या बाजूने पुलाला मोठे भगदाड पडले आहे.

बेगमपूर (सोलापूर) : भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर मंगळवेढा मार्गावरील बेगमपूर-माचणूर दरम्यान भीमा नदीवरील पुलाची एक बाजू खचली आहे. पुलाची स्थिती धोकादायक बनल्याने मार्गावरील वाहतूक सद्य स्थितीत बंद असून संबंधित विभागाकडून पाहणी केल्यानंतरच वाहतूक सुरू होईल, अशी माहिती मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.

भीमेला आलेल्या महापूरामुळे बेगमपूर माचणूर दरम्यान नदीवरील पूल दोन दिवसाहून अधिक काळ पाण्याखाली होता. नदीपात्रातील पाण्याच्या प्रचंड वेगामुळे पुलावरील दोन्ही बाजूने लोखंडी संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. पुलावरील डांबरीकरणाचा भाग उखडून निघाला आहे. माचणूरच्या गावच्या बाजूने पुलाला मोठे भगदाड पडले आहे.

बाजूचा भरावा वाहून गेल्याने पुलाची स्थिती धोकादायक बनली आहे. सदर मार्ग राष्ट्रीय महामार्गांतर्गत आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती व देखभाल संबंधित विभागाकडे येत असल्याने सकाळी अकरापर्यंत संबंधित विभागाकडून पाहणी करून वाहतूक सुरू करायची की ठप्प ठेवायची याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वत्र निर्माण झालेली भयानक परिस्थिती व उदभवलेली पुलाची सद्य स्थिती पाहता वाहन धारकांनी वाहतुकीसाठी घाई करू नये. पुलाची पाहणी करून योग्य अहवाल प्राप्त झाल्यावरच वाहतूक सुरू केली जाणार असल्याचे मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी सांगितले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One side of the bridge over the Begumpur Machnur Bhima river Is worn out