बार्शीतील तरुणांचा आदर्श ! रक्तदान सप्ताहात 1035 दात्यांचे रक्तदान 

प्रशांत काळे 
Monday, 26 October 2020

कोरोनामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्यासाठी बार्शी शहर व ग्रामीण भागात 18 ते 25 ऑक्‍टोबर दरम्यान रक्तदान शिबिर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. शिबिरात 1035 रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले. 

बार्शी (सोलापूर) : कोरोनामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्यासाठी बार्शी शहर व ग्रामीण भागात 18 ते 25 ऑक्‍टोबर दरम्यान रक्तदान शिबिर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. शिबिरात 1035 रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले. 

कोरोनामुळे लॉकडाउन सुरू झाल्यानंतर सर्वत्र जनजीवन ठप्प झाले. एकीकडे कोरोनाचे रुग्ण आणि इतर आजारांच्या अत्यवस्थ रुग्णांची रक्ताची मागणी वाढत असताना रक्तदान शिबिराच्या आयोजनांवर मात्र मर्यादा आल्यामुळे रक्तपेढीत होणारे संकलन मंदावले. सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांच्या आवश्‍यक शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. तालुक्‍यातूनच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील अनेक गावांमधून रुग्ण उपचारासाठी बार्शीत येतात. त्यांना रक्ताची कमतरता भासू नये यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी रक्तदान करण्याचे आवाहन तालुक्‍यातील युवक कार्यकर्त्यांना केले होते. 

सप्ताहात झालेल्या शिबिरात तालुक्‍यातील हळदुगे 93, उपळाई 49, बावी 112, झरेगाव 95, काटेगाव 50, चारे 35, सारोळे 104, नांदणी 75, उपळे 71 व बार्शी शहर 350 असे एकूण 1035 दात्यांनी रक्तदान केले. 

शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी स्वतः रक्तदान करून केले. या वेळी नगराध्यक्ष ऍड. असिफभाई तांबोळी, सभापती रणवीर राऊत, पंचायत समिती सभापती अनिल डिसले, रमेश पाटील, वैरागचे संतोष निंबाळकर, संचालक रावसाहेब मनगिरे, नगरसेवक विजय राऊत, बाबासाहेब कथले आदी उपस्थित होते. 

रक्तदान सप्ताहास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक, नगरपालिकेतील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले. शहर व ग्रामीण भागात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे भगवंत रक्तपेढीचे अध्यक्ष शशिकांत जगदाळे यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One thousand youths from Barshi taluka donated blood on the occasion of Blood Donation Week