
वीरशैव मंगल कार्यालय व रुक्मिणी माता मुलींच्या वसतिगृहामध्ये ग्रामीण भागातील व शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी कोव्हिड सेंटर उभा करण्यात आले. परंतु तालुक्यातील रुग्णसंख्या घटल्यामुळे वीरशैव मंगल कार्यालयातील कोव्हिड सेंटर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये व विलगीकरणात व्यवस्थित उपचार करता यावेत म्हणून वीरशैव मंगल कार्यालय व रुक्मिणी माता मुलींच्या वसतिगृहामध्ये ग्रामीण भागातील व शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी कोव्हिड सेंटर उभा करण्यात आले. परंतु तालुक्यातील रुग्णसंख्या घटल्यामुळे वीरशैव मंगल कार्यालयातील कोव्हिड सेंटर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाची साखळी नियंत्रित करण्यात प्रशासन व नागरिकांचे मोठे सहकार्य लाभल्याने तालुक्याच्या दृष्टीने ही बाब सुखावह ठरली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, मार्च महिन्यापासून लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. तालुक्यातील पहिला रुग्ण घेरडीत सापडल्यामुळे प्रशासनाने भोसे ते घेरडी वाहतूक बंद केली. ग्रामीण भागातील काही गावांनी रस्त्यावर काटेरी झाडे टाकून आपले गाव सुरक्षित ठेवण्याकडे भर दिला. अशा परिस्थितीत कोरोनाशी लढताना प्रशासनाने उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्नील रावडे, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये कोरोनाची साखळी नियंत्रित करण्यात यश मिळवले. तरी देखील लोकांकडून काही ठिकाणी उपद्रव होण्याचा प्रयत्न झाला. परंतु, पोलिसांनी आपल्या खाकीचा धाक दाखवून वातावरण नियंत्रित केले.
तालुक्यात आतापर्यंत 30 हजार 418 लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. त्यामध्ये एक हजार 772 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यातील एक हजार 690 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर तालुक्यात 48 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य खात्याच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करून याबाबतचे रुग्ण शोधण्यात आले व संबंधितांवर तातडीने गृह व संस्थात्मक विलगीकरण करून ही साखळी नियंत्रित करण्यात यश मिळवले. त्यामुळे वीरशैव मंगल कार्यालय व रुक्मिणी माता मुलींच्या वसतिगृहामध्ये ग्रामीण भागातील व शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी कोव्हिड सेंटर उभा करण्यात आले. परंतु तालुक्यातील रुग्णसंख्या घटल्यामुळे वीरशैव मंगल कार्यालयातील कोव्हिड सेंटर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
तालुक्यामध्ये "माझे कुटुंब - माझी जबाबदारी' मोहिमेत घरोघरी आरोग्य सेवक, सेविका, आशा व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. यामुळे कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश आल्याने तालुक्याचा मृत्युदर 2.70 राहिला आहे. अजूनही को-मॉर्बिड रुग्णांची तपासणी आठवड्यातून दोन वेळा सुरू आहे.
- डॉ. नंदकुमार शिंदे,
तालुका आरोग्य अधिकारी
तालुक्यामध्ये तुलनात्मकदृष्ट्या आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्या तरी आरोग्य यंत्रणेने घेतलेले कष्ट व त्यांना प्रशासनाने दिलेली साथ, शिवाय विलगीकरण कार्यक्रम प्रशासनाने प्रभावीपणे राबवला. त्यास नागरिक, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यम यांच्यातील सुसंवादामुळे तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रसार आणि मृत्युदर रोखण्यात यश आले.
- उदयसिंह भोसले,
उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा
संपादन : श्रीनिवास दुध्याल