आवक घटल्याने किरकोळ बाजारात महागला कांदा 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

नवीन कांद्याचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने पुढील काही महिने तरी बाजारात नवीन कांदा मोठ्या प्रमाणात येण्याची शक्‍यता कमीच आहे. ज्या शेतकऱ्यांनी जुना कांदा साठवून ठेवला होता. त्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळू लागला आहे. यापुढील काळातही जुन्या कांद्याच्या दरामध्ये आणखीन वाढ होईल अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे नवीन कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील काही महिने तरी बाजारात मोठ्या प्रमाणात नवीन कांदा येण्याची शक्‍यता कमीच आहे. बाजार समितीत येणारी कांद्याची आवक घटल्याने किरकोळ बाजारात कांद्याच्या दरामध्ये वाढ होऊ लागली आहे. 

जुन्या कांद्याला ठोक बाजारात व किरकोळ बाजारात मागणी वाढली आहे. सध्या ठोक बाजारात चांगल्या प्रतीचा जुना कांदा सात हजार रुपये क्विंटल दराने मिळत आहे. हा कांदा किरकोळ बाजारात 80 ते 90 रुपये किलो दराने विकला जात आहे. अतिवृष्टी होण्यापूर्वी बाजारात नवीन कांदा येण्यास सुरुवात झाली होती. नवीन कांद्याला घाऊक बाजारात पाच हजार रुपये क्विंटल असा दर होता. हा कांदा किरकोळ बाजारात 60 ते 65 रुपये दराने विकला जात होता. 

नवीन कांद्याचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने पुढील काही महिने तरी बाजारात नवीन कांदा मोठ्या प्रमाणात येण्याची शक्‍यता कमीच आहे. ज्या शेतकऱ्यांनी जुना कांदा साठवून ठेवला होता. त्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळू लागला आहे. यापुढील काळातही जुन्या कांद्याच्या दरामध्ये आणखीन वाढ होईल अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

कांदा व्यापारी इम्रान शेख यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे नवीन कांदा खराब झाला आहे. बाजार समितीत कांद्याची येणारी आवक घटल्याने कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. या पुढील काळातही कांद्याच्या दरात वाढच होत राहील असा अंदाज आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion became more expensive in the retail market due to declining income in Solapur