हॉटेल व्यवसायाच्या अभावी कांद्याने पुन्हा उत्पादकांना रडवले: कांद्याला मिळतोय 'इतका' भाव 

प्रकाश सनपूरकर
Thursday, 6 August 2020

लॉकडाउनपूर्वी देखील कांद्याचे भाव कोसळलेले होते. लॉकडाउनचा काळ संपत आला तेव्हा कांद्याला समाधानकारक दर मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात कांद्याच्या अर्थकारणाला बळकटी देणारी हॉटेलिंगसारखे व्यवसाय पूर्ण क्षमतेने अद्याप सुरू झालेले नाहीत. काही हॉटेल्स व्यावसायिकाकडून केवळ पार्सल सेवा दिली जात आहे. हॉटेल न उघडल्याने कांद्याची ग्राहकी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. हॉटेल व्यवसायात कांद्याची खरेदी सर्वाधिक असते.

सोलापूरः कांद्याचा पडलेल्या भावाचा वांधा लॉकडाउननंतर सुटेल अशी अपेक्षा असताना हॉटेलिंग सेवा क्षेत्राच्या लॉकडाउनच्या अडथळ्याने पुन्हा एकदा कांदा उत्पादकांना दर कोसळल्याने फटका बसला आहे. कांद्याचे भाव शेतकऱ्यांना माल वाहतुकीला देखील न परवडणारे झाले आहेत.साडेआठशे रुपये प्रती क्विंटल पर्यत दर कोसळल्याने कांदा उत्पादक संकटात सापडले आहेत. 

हेही वाचाः वरुणराजाची  कृपा पण कृषीकेंद्राची अवकृपा! येथील शेतकऱ्यांची सुरू आहे ससेहोलपट 

लॉकडाउनपूर्वी देखील कांद्याचे भाव कोसळलेले होते. लॉकडाउनचा काळ संपत आला तेव्हा कांद्याला समाधानकारक दर मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात कांद्याच्या अर्थकारणाला बळकटी देणारी हॉटेलिंगसारखे व्यवसाय पूर्ण क्षमतेने अद्याप सुरू झालेले नाहीत. काही हॉटेल्स व्यावसायिकाकडून केवळ पार्सल सेवा दिली जात आहे. हॉटेल न उघडल्याने कांद्याची ग्राहकी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. हॉटेल व्यवसायात कांद्याची खरेदी सर्वाधिक असते. तसेच घरगुती ग्राहकी देखील सध्या अपुरीच आहे. उन्हाळ्याच्या तुलनेत इतर काळातील मागणी थोडी कमी असते. पण कमी मागणीची ही भर हॉटेलिंग क्षेत्रातून काढली जाते. अजूनही हॉटेल पुर्ण क्षमतेने सुरू होत नसल्याने कांदा उत्पादकांच्या समोर दरवाढीचा प्रश्‍न कायमच आहे. 

हेही वाचाः सावधान! सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्‍यात बिबट्याचा वावर 

सोमवारी (ता.3) पासून मार्केट यार्ड सुरू झाले तेव्हा कांद्याला आता चांगला भाव मिळेल असा अंदाज होता. मात्र हॉटेलिंगवरचे निर्बंध कायम राहिल्याने पुन्हा एकदा कांद्याचे भाव कोसळले आहेत. सोलापूर मार्केट यार्डातून सोलापूर जिल्ह्यासह विजयपूर, अहमदनगर, पूणे व नाशिक भागातून कांद्याची आवक सातत्याने सुरू असते. पण भाव नसल्याने त्या भागातील कांदा उत्पादक देखील अडचणीत सापडले आहेत. 
सोलापूर बाजारातून कांदा आंध्र प्रदेश, हैद्राबाद, जहिराबाद, निझामाबाद, विजयवाडा, राजमंद्री आदी भागात पाठवला जातो. तमिळनाडूमधील चेन्नई, सेडम, कुंभकोणम, तेलगंणा येथे कांदा जातो. कर्नाटकात बेंगलुरू, चित्रदुर्ग, तुमकूर, राणी बेन्नुर या बाजारात कांदा पाठवला जातो. मात्र या भागातून देखील मागणी साधारणच आहे. इतर राज्यातील लॉकडाउन निर्बंधामुळे तेथील मागणी साधारण आहेत. स्थानिक व परराज्यातील मागणी घटल्याचा हा फटका बसला आहे. सोलापूर भागात हॉटेलिंग सेवा पूर्णपणे सुरू झाल्याशिवाय कांद्याची मागणी वाढणार नाही हे स्पष्ट आहे. बुधवारी (ता.5) रोजी कांद्याला केवळ 100 रुपये ते 850 रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला. हे भाव बाजारात कांदा वाहतुकीसाठी देखील परवडणारे नाहीत. 

कांदा मागे पण लसणात तेजी 
कांद्याची बाजारात पडझड सूरू असताना लसणाचे भाव मात्र 9 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. घरगूती ग्राहकांच्या नियमित मागणीमुळे व कमी आवकीने लसणाचे भाव वधारले आहेत. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion growers cry again over lack of hotel business: Onions are getting 'so much' price