कांदा बियाणांच्या दरात झाली दुपटीने वाढ

राजाराम माने 
Sunday, 13 September 2020

यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रासह देशांमध्ये कांदा बियाणांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी मागणी जास्त आणि बियाणे कमी यामुळे बियाण्यांचे दर मात्र दुपटीने वाढले आहेत.

केतूर (सोलापूर) : यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रासह देशांमध्ये कांदा बियाणांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी मागणी जास्त आणि बियाणे कमी यामुळे बियाण्यांचे दर मात्र दुपटीने वाढले आहेत. गतवर्षी १५०० रुपये कांदा बियाण्याचा दर होता. यावर्षी मात्र ३५०० ते ३६०० हजार रुपये एवढा झाला आहे. त्यातच यावर्षी कांद्याला म्हणावा तसा दर मिळाला नाही. आज ना उद्या भाव मिळेल, या आशेने बराकीत शेतकर्‍यांनी कांदा साठवून ठेवला तो कांदा मोठ्या प्रमाणावर नसल्यामुळे नुकसानच झाले. त्यामुळे कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत आला. तसेच आर्थिक अडचणी वाढल्याने कांदा उत्पादक संकटात आला आहे.

कांदा बियांचा तुटवडा व सध्या वाढते दर लक्षात घेता देशाने बाहेर देशात होणारी निर्यात थांबवावी, अशी मागणी कांदा उत्पादकांनी केली आहे. त्यातच यावर्षी सरासरीपेक्षा ज्यादा पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यापुढे दरवाढीने संकट निर्माण केले आहे. उन्हाळी कांद्याचे बियाणे यांचे भाव वरचेवर वाढतच आहेत. मागील एक दोन वर्षात कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने करमाळा तालुक्यात कांद्याच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. आता यावर्षी पाऊस वेळेवर झाल्याने जून महिन्यात पेरणी झालेल्या खरिपाच्या मका, मूग, उडीद, सोयाबीन पिकांची क्षेत्रात आता रिकामी झाली आहेत. त्यातच यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा लागवडीचे नियोजन केले आहे. परंतु बियाणांच्या वाढलेल्या दरामुळे संकटात मात्र भरच पडली आहे.

यंदा कांद्याला चांगला दर मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी आपला मोर्चा कांदा लागवडीकडे वळवला आहे. कांदा बियाणांच्या दरात वाढ झाली असली तरी महागडे कांदा बियाणे शेतकरी खरेदी करून कांदा लागवड करत आहेत. यावर्षी कोरोना महामारीच्या संकटाचा सर्वात जास्त फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. त्यातच बियाणांची झालेली वाढ संकटात भर घालणारी ठरली आहे.

केतूरचे लक्ष्मीकांत पाटील म्हणाले, कांद्याला यापुढे निश्चितच चांगला दर मिळेल. या आशेने महागडे बियाणे खरेदी करून कांदा लागवड केली आहे.
 
कोर्टीचे भर्तरीनाथ अभंग म्हणाले, दरवर्षी कांदा पीक घेत आहे. तरी यंदा बियाणे उपलब्ध नसल्यामुळे आणि बियाण्याचा तुटवडा असल्याने गतवर्षीच्या बियाण्यांचे रोप टाकले असून यंदा त्याचीच कांदा लागवड करावी लागणार आहे. साडे तीन हजार रुपये किलो मोजून देखील यंदा बियाणे मिळत नाही.

पोमलवाडीचे विकास मगर म्हणाले, कोरोना महामारीचे संकट संपल्यानंतर निश्चितच कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा लागवड केली आहे
    
संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion seed prices have doubled due to high demand for onions and low seed