Breaking ! प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा; वाढत्या कोरोनामुळे सोलापूर विद्यापीठाचा निर्णय

तात्या लांडगे
Monday, 1 March 2021

मार्चएण्ड अथवा एप्रिलमध्ये होईल परीक्षा
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने आम्ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन केले आहे. मार्चएण्ड किंवा एप्रिलमध्ये या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे.
- डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्र-कुलगुरु, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सोलापूर : कोरोना पुन्हा जोर धरु लागल्याने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. मार्चएण्ड अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून परीक्षेला सुरवात होणार असून विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देता येणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित 101 महाविद्यालयांमधील 35 हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

प्रात्यक्षिक गुणांअभावी रखडला निकाल
द्वितीय व अंतिम वर्षातील विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा जानेवारीत पार पडली. बीए, बी-कॉमच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असून ज्या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागते, अशा अभ्यासक्रमांचे निकाल अजूनही जाहीर झालेले नाहीत. काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण विद्यापीठाला कळविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने त्यासाठी महाविद्यालयांना 2 मार्चपर्यंत मुदत दिली आहे. महाविद्यालयांकडून प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण प्राप्त झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

सोलापूरसह राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत ऑनलाइन परीक्षेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले. विद्यापीठ स्तरावर प्रशासनाने योग्य तो निर्णय घेण्याच्याही सूचना केल्या आहेत. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने जानेवारीत द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची ऑनलाईनच परीक्षा घेतली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर बोलावून परीक्षा घेणे अशक्‍य मानले जात आहे. त्यामुळे विद्यापीठाने ऑफलाइन परीक्षा घेण्याच्या नियोजनात बदल करुन प्रथम वर्षाची परीक्षाही ऑनलाइन घेण्याचे निश्‍चित केले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत विद्यापीठाने हा निर्णय घेतल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

मार्चएण्ड अथवा एप्रिलमध्ये होईल परीक्षा
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने आम्ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन केले आहे. मार्चएण्ड किंवा एप्रिलमध्ये या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे.
- डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्र-कुलगुरु, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online exams for first year students; Decision of Solapur University due to rising corona