ऑनलाईन मटका बुकी प्रकरण, नगरसेवक सुनील कामाटी सह चौघांना जामीन मंजूर 

प्रमोद बोडके
Monday, 28 September 2020

अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस या गुन्ह्यातील भा. द.वि 420 कलम हे लागू होत नाही. तसेच आरोपी हा नगरसेवक आहे. तो कुठेही पळून जाणार नाही असे मुद्दे मांडले ते ग्राह्य धरून न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्‍यावर जामीन मंजूर केला.

सोलापूर : राजभुलक्ष्मी इमारत कोंचिकूर्वी गल्ली सोलापूर या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय जगताप व त्याच्या सहकाऱ्यांनी 24 ऑगस्टला मटका बुकी वर छापा टाकला होता. आरोपी सुनील कामाटी व त्यांची पत्नी, इस्माईल मुच्छाले आणि रफिक तोनशाळ यांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एम. एम. बवरे यांनी जामीन मंजूर केला आहे. 

पोलिसांनी छापा टाकून तेथे काही इसमाना अटक केली होती. मुख्य सूत्रधार म्हणून नगरसेवक सुनील कामाटी व काही आरोपींना भागीदार म्हणून अटक केली होती. या गुन्ह्याच्या तपासात मटका व्यवसायातून 307 कोटींचा व्यवहार पोलिसांनी दाखविला होता. नगरसेवक सुनील कामाटी यास 23 सप्टेंबरला पोलिसांनी हैद्राबाद येथून अटक केली होती. चौघांनी वकिलामार्फत जामीन मिळणे साठी अर्ज दाखल केला होता. 

नगरसेवक सुनील कामाटी यांच्या पत्नी सुनीता कामाटी यांना दिलेला अंतरीम जामीन कायम केला आहे. याप्रकरणी आरोपीतर्फे ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. विनोद सूर्यवंशी ऍड. श्रीकांत पवार यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे ऍड. जाधव यांनी काम पाहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Matka bookie case, four granted bail along with corporator Sunil Kamati