विठ्ठल दर्शनासाठी नाही आता ऑनलाइन पासची गरज ! दररोज आठ हजार भाविक घेऊ शकतील मुखदर्शन 

भारत नागणे 
Monday, 11 January 2021

कोरोना काळात सलग नऊ महिने विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद होते. त्यानंतर दिवाळी पाडव्यापासून कोरोनाचे सर्व नियम पाळून ऑनलाइन पासद्वारे विठ्ठल- रुक्‍मिणीचे मुखदर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दररोज पाच हजार भाविकांना मुखदर्शन देण्यात येत होते. त्यामध्ये उद्यापासून दररोज आठ हजार भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : देशभरातील विठ्ठल- रुक्‍मिणी भक्तांना नवीन वर्षाच्या सुरवातीलाच मंदिर समितीने आनंदाची बातमी दिली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या ऑनलान पासची सक्ती रद्द करण्यात आली असून, पासविनाही आता विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आज मंदिर समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये विनापास दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती औसेकर महाराज यांनी दिली. 

कोरोना काळात सलग नऊ महिने विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद होते. त्यानंतर दिवाळी पाडव्यापासून कोरोनाचे सर्व नियम पाळून ऑनलाइन पासद्वारे विठ्ठल- रुक्‍मिणीचे मुखदर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दररोज पाच हजार भाविकांना मुखदर्शन देण्यात येत होते. त्यामध्ये उद्यापासून दररोज आठ हजार भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. 

दरम्यान, ऑनलाइन बुकिंग करूनही भाविक दर्शनासाठी येत नसल्याने मंदिर रिकामे राहात असल्याची बाब समितीच्या लक्षात आल्यानंतर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाइन पास काढण्याची गरज नाही, असा निर्णय घेण्यात आला. मंदिर समितीच्या या निर्णयामुळे ऐववेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे. दरम्यान, 65 वर्षांवरील वृद्ध व्यक्ती आणि 10 वर्षांखालील लहान मुलांना मंदिरातील प्रवेश बंदी कायम ठेवण्यात आली आहे. 

कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही आता वाढू लागली आहे. परंतु पास नसल्याने भाविकांची गैरसोय होत होती. भाविकांच्या मागणीनुसार मंदिर समितीने पासविना दर्शन देण्याचा निर्णय घेतल्याने पंढरीत येणाऱ्या भाविकांना आता कोरोनाचे सर्व नियम पाळून विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे. 

बैठकीला समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जवळगावकर, संभाजी शिंदे, साधना भोसले, शकुंतला नडगिरे, श्री. जवंजाळ महाराज, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते. 

संक्रांतीनिमित्त महिलांसाठी विशेष सोय 
संक्रांतीच्या निमित्ताने शहर व परिसरातील महिलांना सायंकाळी चारनंतर रुक्‍मिणी मातेच्या दर्शनासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. परंतु, मंदिरात व परिसरात महिलांना वाण-वसा घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मंदिराचे ऑडिट केले जाणार आहे, असेही औसेकर महाराज यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online pass will no longer be required for Vitthal Mukh Darshan