नवरात्रानिमित्त श्री रुपाभवानी मंदिरात दहा जणांनाच परवानगी ! 31 ऑक्‍टोबरनंतर श्री सिध्देश्‍वर यात्रेचा निर्णय 

3Solapur_4.jpg
3Solapur_4.jpg

 सोलापूर : शारदीय नवरात्र महोत्सवाला आता सुरवात झाली असून श्री रुपाभवानी मंदिरात धार्मिक विधी करण्याच्या निमित्ताने होम विधी, दसरा आणि पौर्णिमेसाठीच 35 ऐवजी 10 जणांना परवानगी देण्याचा निर्णय पोलिस आयुक्‍तालयाने घेतला आहे. तर दुसरीकडे होम, दसरा आणि पौर्णिमेसाठी 50 लोकांची परवानगी द्यावी आणि इतरवेळी 20 ते 25 लोकांना परवानगी असावी, अशी मागणी मंदिराचे विश्‍वस्त मल्लिनाथ मसरे यांनी केली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. 


श्री रुपाभवानी मातेचा शनिवारपासून (ता. 17) दररोज छबिना मिरणवूक काढून मंदिराला प्रदक्षिणा घातली जात आहे. त्यानंतर 23 तारखेला रात्री आठ ते साडेअकरा वाजेपर्यंत होम विधी होणार असून 25 ऑक्‍टोबरला दसऱ्यानिमित्त सायंकाळी पाच वाजता पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. तर 31 ऑक्‍टोबरला पौर्णिमेनिमित्त रात्री दहा वाजता मंदिरातच छबिना काढला जाणार आहे. त्यासाठी शास्त्री, मानकरी, सफाई कर्मचारी, लाईटमनची गरज लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मंदिराचे मानकरी मसरे यांच्या कुटुंबातील आठजण, ओटी भरण्यासाठी महिला, वायरमन, स्वच्छता कामगार, पुजारी अशा लोकांची गरज असल्याचे मसरे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. मात्र, कोरोनामुळे मंदिरात भाविकांना दर्शनात येण्यास बंदी असून बॅरिकेट लावून पोलिसांनी सर्व मार्ग बंद केले आहेत. त्यामुळे धार्मिक विधीसाठी चार पुजारी, चार विश्‍वस्त आणि एक सफाई कर्मचारी व एक लाईटमन अशा दहा लोकांनाच परवानगी असेल, असे जोडभावी पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 


मंदिरात 35 ते 50 जणांना द्यावी परवानगी 
शासनाच्या निर्देशानुसार आम्ही मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्याची ग्वाही दिली आहे. मात्र, होम विधी, दसरा, पौर्णिमेला मोठे उत्सव असल्याने 50 लोकांची परवानगी द्यावी. तसेच इतर सात दिवस किमान 15 जणांना परवानगी असावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. त्यात स्वच्छता कर्मचारी, लाईटमनचा समावेश असेल. 
- मल्लिनाथ मसरे, वहिवाटदार, श्री रुपाभवानी मंदिर 


35 नव्हे, 10 जणांनाच असेल परवानगी 
नवरात्र महोत्सवानिमित्त श्री रुपाभवानी मंदिरातील महत्वाच्या धार्मिक कार्यक्रमांसाठी सुरवातीला 35 जणांना परवानगी देण्याचा विचार होता. मात्र, यंदा कोरोनामुळे उत्सव साधेपणाने साजरा केला जाणार असल्याने मंदिरातील पुजाअर्चा करण्यासाठी 10 लोकांची परवानगी असेल. मंदिराच्या वहिवाटदारांनी यादी दिल्यानंतर त्यांना स्वतंत्र पास दिले जातील. 
- शिवशंकर बोंदर, पोलिस निरीक्षक, जोडभावी पेठ 


लॉकडाउन निर्णयांनतर श्री सिध्देश्‍वर यात्रेचे नियोजन 
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात 31 ऑक्‍टोबरपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात यावा, संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेत मंदिरे उघड्यास परवानगी दिलेली नाही. ऑक्‍टोबरअखेर शासनाकडून अनलॉकसंदर्भात नव्या सूचना, मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील. त्यानंतर ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वर यात्रेचे नियोजन केले जाईल, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com