"कुळाचे दान पावलं, दान पावलं..!' काळाबरोबर लोककलावंतांचीही बदलली जीवनशैली

अनिल जोशी 
Tuesday, 9 March 2021

चारे परिसरातील मराठवाड्या लगतच्या कोरेगाव, धामणगाव (आ), बोरगाव, काटेगाव, कळंबवाडी, चुंब, वालवड या गावांत सुगीच्या दिवसांत डोंबारी, ढवळा नंदीबैल, पिंगळा, कुडमुडे जोशी, बहुरूपी, वैदू, मरिआईचा गाडा, हे लोककलावंत आपापली कला सादर करून पायली, आदली धान्य हक्काने शेतकऱ्यांकडून मागून घेतात. 

चारे (सोलापूर) : वेळ भल्या पहाटेची... सुगीचे दिवस असल्याने, बाया बापडे ज्वारी काढणीस जायच्या तयारीत... तर तरुणाई साखरझोपेत... कानी कुडमुड्याचा आवाज... "जीव झाला म्हातारा, आशीर्वाद घ्यावा, माय तुझ्या लेकराला, धर्म दिला वस्त्रांची घडी... पळेल तुझ्या संसाराची गाडी...' आणि तेवढ्या सकाळी हे आर्जव ऐकून एखाद्या बाईने दान दिल्यावर "कुळाचे दान पावलं, दान पावलं, हर हर गंगेला, पाताळ गंगेला, सर्व संतांना दान पावलं...' असा आशीर्वाद देत चारे (ता. बार्शी) येथे पालम (जिल्हा परभणी) येथील रामेश्वर अभिमान भोसले हा पिंगळा लोककलावंत गावभर फिरत होता. 

चारे परिसरातील मराठवाड्या लगतच्या कोरेगाव, धामणगाव (आ), बोरगाव, काटेगाव, कळंबवाडी, चुंब, वालवड या गावांत सुगीच्या दिवसांत डोंबारी, ढवळा नंदीबैल, पिंगळा, कुडमुडे जोशी, बहुरूपी, वैदू, मरिआईचा गाडा, हे लोककलावंत आपापली कला सादर करून पायली, आदली धान्य हक्काने शेतकऱ्यांकडून मागून घेतात. पण आता काळ बदलला जग गतिमान झाले. त्याला खेडेगाव, वाड्या- वस्त्याही अपवाद राहिल्या नाहीत. दळणवळणाची साधने उपलब्ध झाल्याने व रेडिओ, दूरदर्शनच्या असंख्य वाहिन्या, मोबाईल फोन आणि इंटरनेट यांच्या प्रसारामुळे करमणुकीचे प्रकार बदलले. त्यामुळे लोककथा, लोककला लोप पावत आहेत. 

शहरातील असो किंवा गावातील, प्रत्येकाला वेळ कमी आहे. परिणामी तीस- चाळीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील स्त्री- पुरुष वरील लोककलांचा अस्वाद चांगल्याप्रकारे घेत असे. लोककलावंत करमणुकी बरोबरच प्रबोधनही करत असत. कलेची कदर करून शेतकरी आपापल्या ऐपतीप्रमाणे कलाकारांना बिदागी देऊन खूष करत असत व या कलावंतांशी पिढ्यान्‌ पिढ्यांचे नाते तयार झालेले असे. 

कलावंतही पारंपरिक पद्धतीने व्यावसाय करत. त्या काळातील शेतकऱ्यांना गावगाड्यात बलुतेदार सांभाळायची माहिती होती. त्यामुळे हात आखडता न घेता लोककलावंतास धान्य दिले जायचे. पण आता शेतकऱ्यांच्या बरोबरच लोककलावंतांच्या गरजा वाढल्या. धान्याऐवजी व्यवहार पैशाशी निगडित झाला. लोककलावंत ब्रॅंडेड गाडीवर येऊन कला सादर करताना गावात येऊन कपडे बदलून कला सादर करू लागला. तर मध्येच मोबाईलवर बोलू लागला. बिदागी म्हणून धान्य नको रोख रक्कम मागू लागला आहे, असे पिंगळा लोककलावंत भोसले सांगत होता. शासनाने केलेल्या सुधारणांमुळे घरं मिळाली, भटकंती थोडी कमी झाली. समाजातील काही तरुण शिक्षित होत असल्याने पारंपरिक व्यवसायाकडे दुर्लक्ष करत आहेत. पण गेल्या वर्षीपासून आलेल्या कोरोना रोगाने पुन्हा एकदा पोट भरण्यासाठी पारंपरिक व्यवसायाचाच आधार घ्यावा लागत आहे. 

कोरोनासारख्या साथीच्या आजारांच्या पाश्वभूमीवर शासनाने लोककलावंतांना पोटापाण्यासाठी थोडेफार मानधन चालू करावे. 
- रामेश्वर भोसले, 
पिंगळा लोककलावंत, पालम, जिल्हा परभणी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the onset of harvest days the presence of folk artists in the rural area increased