आठ दिवस थांबू, पण मंदिर खुले करा; ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला अल्टिमेटम 

Wanchit Aghadi
Wanchit Aghadi

पंढरपूर (सोलापूर) : सरकारने वारकऱ्यांच्या मागणीचा रास्त विचार करुन आज प्रातिनिधीक स्वरुपात आम्हाला मंदिरात दर्शनाला सोडून मंदिर भाविकांना खुले केले आहे. दर्शन सुरु करण्यापूर्वी मंदिरात काय व्यवस्था असावी, या बाबतचा एक आराखडा येत्या आठ दिवसात तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जणार आहे. आठ दिवस आम्ही थांबू. परंतु आठ दिवसात मंदिर खुले केले नाही तर, पुन्हा याच ठिकाणी आम्ही सरकार विरोधात आंदोलन करु, असा इशारा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे दिला. दरम्यान आंदोलनामध्ये वारकऱ्यांचा अत्यल्प सहभाग असल्याचे दिसून आले. 

ऍड. प्रकाश आंबेडकर आज सकाळी पंढरपुरात दाखल झाले होते. दरम्यान, सकाळ पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सचिव यांच्याशी त्यांची चर्चा झाली. त्यानंतर पोलिसांनी प्रकाश आंबेडकरांसह अन्य 11 लोकांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यासाठी परवानगी दिली. दुपारी दोन वाजता प्रकाश आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिरात जावून विठ्ठल रुक्‍मिणीचे मुखदर्शन घेतले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा सरकारचा निर्णय योग्य असला तरी लोक भावनेचा विचार करुन सरकारने आता राज्यीतल सर्वच मंदिरे खुली करावीत. आज आम्हाला दर्शन देवून मंदिरे खुली केली आहेत. येत्या आठ दिवसात एसओपी तयार झाल्यानंतर मंदिरात वारकरी भाविकांना दर्शनासाठी सोडले जाईल. दरम्यान, देवाचे पदस्पर्श दर्शन सुरु करण्यासाठी आणखी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

आज सकाळपासूनच मुंबई, पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भातून शेकडो कार्यकर्ते पंढरपुरात दाखल झाले होते. पोलिसांनी शिवाजी चौकातच बॅरिकेडींग करुन मंदिराकडे जणारा रस्ता बंद केला होता. दुपारी अचानक कार्यकर्त्यांनी बॅरिकेडींग तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. दर्शनानंतर येथील शिवाजी चौकात सभा झाली. 
यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, वारकरी आणि भाविकांनाच्या मागणीनुसार वंचितच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. आज हे आंदोलन यशस्वी झाले आहे. सरकारला मंदिर सुरु करण्यास भाग पाडले आहे. आंदोलना दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी येथील पोलिस आणि महसूल प्रशासनाने चांगली भूमिका पार पाडली. येत्या आठ दिवसात दर्शन व्यवस्थे संदर्भात एक कृती आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानुसार दर्शन व्यवस्था केली जाणार आहे. आठ दिवसात जर मंदिर दर्शनासाठी खुले केले नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

आंदोलनात वारकऱ्यांचा सहभाग अत्यल्प 
आंदोलकांनी एक लाख वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रवेश केले जाईल, असा जाहीर केले होते. दरम्यान वारकरी पाईक संघ आणि वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेने यापूर्वीच आंदोलनाला विरोध करत वारकरी आंदोलनात सहभागी होणार नाहीत, असे स्पष्टीकरण दिले होते. आज प्रत्यक्ष काही मोजके वारकरी आणि महाराज मंडळींचा अपवाद सोडला तर वारकऱ्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचेच चित्र दिसून आले. आजच्या आंदोलानामध्ये सुमारे दीड ते दोन हजार लोक सहभागी झाले, असतील असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 
पंढरपुरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर असतानाही आज विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये शेकडो आंदोलक सहभागी झाले होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. आंदोलानामध्ये शेकडो कार्यकर्ते राज्याच्या विविध भागातून आले होते. कार्यकर्त्यांना ना मास्क होता, ना सॉनिटाझरचा वापर केला. कोणतीही खबरदारी न घेता कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची भीती देखील या निमित्ताने निर्माण झाली आहे. 

संजय राऊतांवर टीका 
आजच्या वंचित बहुजन वंचित विकास आघाडीच्या विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला आज प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले. संजय राऊतांनी राज्य घटनेचे अभ्यास सुरु केला आहे, ही बाब चांगली आहे. पण त्यांचा अभ्यास अजूनही पूर्ण झाला नाही. घटनेने सर्वांना अधिकार दिले आहेत. सरकारने काय केले पाहिजे, असे विचारण्याचा अधिकार जनतेला दिला आहे, असे सांगत त्यांनी राऊतांवर निशाना साधला. 

पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये ढकलाढकली 
ऍड. प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी आल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी करत बॅरिकेडींग तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखून धरले. यावेळी पोलिस आणि वंचितच्या काही कार्यकर्त्यांमध्ये ढकलाढकलीही झाली. 

आंदोलनाची क्षणचित्रे... 

  • शहराकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर तापासणी नाके 
  • शिवाजी चौकातच कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले 
  • मंदिर परिसरातील सर्व दुकाने, हॉटेल आज दिवसभर बंद. 
  • आंदोलनामध्ये महिलांचा उत्स्फुर्त सहभाग 
  • मराठवाडा, विदर्भ, मुंबई येथून अधिक कार्यकर्ते सहभागी 
  • आंदोलनात प्रत्यक्ष वारकऱ्यांचा सहभाग अत्यल्प 
  • मंदिर परिसरातील 30 रस्त्यांवर बॅरिकेडींग 
  • राज्य राखीव पोलिस दलाला तुकडीही तैणात 
  • चारशे पोलिसांचा चोख बंदोबस्त 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com