दहावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना आयटीआय प्रवेशाची संधी ! 

दिनेश देशमुख 
Friday, 1 January 2021

सद्य:स्थितीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट - 2020 सत्रातील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. 

बोंडले (सोलापूर) : नोव्हेंबर - डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जे उमेदवार इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशास इच्छुक असतील अशा उमेदवारांना संचालनालयाच्या वतीने प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दीप्रेंद्र सिंह कुशवाह यांनी संकेतस्थळावरून प्रसिद्ध केली आहे. 

सद्य:स्थितीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट - 2020 सत्रातील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यानुसार राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश पूर्ण क्षमतेने होणे, प्रवेश अर्जात दुरुस्ती करणे व इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रवेश अर्ज सादर करणे व प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा 1 जानेवारी 2021 पासून संचालनालयाच्या http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

प्रवेशाचे वेळापत्रक 

  • ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे व अर्जात दुरुस्ती करणे : 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2021, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 
  • गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : 5 जानेवारी 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत 
  • संस्थास्तरीय समुपदेशन फेरी : 1 जानेवारी ते 7 जानेवारी 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत 
  • खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संस्था स्तरावरील प्रवेश : 8 ते 15 जानेवारी 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत 

तंत्रज्ञान क्षेत्रात कौशल्य आधारित शिक्षणाअभावी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी असूनही अशा नोकऱ्यांपासून वंचित राहण्याची वेळ शिक्षित मुलांवर ओढवत आहे. त्यामुळे दहावीनंतर विद्यार्थ्यांनी कौशल्य निर्मितीच्या अभ्यासक्रमांचा विचार करायला हवा. या अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना व्यवसाय कौशल्य प्राप्त होत असल्याने याद्वारे कारखान्यांतील कुशल कामगारांची गरज भागवता येणे शक्‍य आहे. याकरिता इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी शासनाच्या आयटीआयमधील वाढीव प्रवेश मुदतीचा फायदा घ्यावा. 
- जोहर आवटे, 
प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खंडाळी, अकलूज 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opportunity for ITI admission to the candidates who have passed the tenth Supplementary Examination