नक्षल्यांकडून फडणवीसांना धोका असतानाही सरकारने काढली सुरक्षा, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर : नव्या पोलिस महासंचालकांना तेवढ्यासाठीच आणल्याची शंका 

प्रमोद बोडके
Sunday, 10 January 2021

उपमहापौर काळेंच्याबाबतीत पक्ष योग्य निर्णय घेईल 
सोलापूर महापालिकेचे भाजपचे उपमहापौर राजेश काळे हे सातत्याने वादग्रस्त ठरत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा अहवाल सोलापुरातील भाजप नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पाठविला आहे. याबाबत विरोधी पक्षनेते दरेकर यांना विचारले असता ते म्हणाले, उपमहापौर काळे यांच्या बाबतीत भाजप निश्‍चितपणे दखल घेईल. याबाबतचे संपूर्ण अधिकार हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना आहेत. त्यामुळे या प्रकरणाबद्दल मी जास्त बोलणे योग्य होणार नाही. 

सोलापूर : माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नक्षल्यांकडून धोका असल्याचा पोलीस महासंचालकांचा अहवाल आहे. तरी देखील राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेली बुलेट-प्रुफ गाडी देखील काढण्याचा निर्णय सरकारने घेतला असून सरकारचा हा कोतेपणा असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. 

आमची सुरक्षा काढली म्हणून आम्ही काय तडफडून मरत नाहीत, या विषयावर आम्हाला फार काही बोलायचे नाही. परंतु महाराष्ट्रातील महिला युवती व सर्वसामान्य जनतेला सरकारने सुरक्षा द्यावी अशी अपेक्षाही विरोधी पक्षनेते दरेकर यांनी व्यक्त केली. सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर हॉटेल बालाजी सरोवरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री व भाजप आमदार सुभाष देशमुख उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते दरेकर म्हणाले, तत्कालिन पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल यांच्या कालावधीत आलेल्या अहवालात देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा आणखी वाढविण्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर नव्याने आलेल्या पोलिस महासंचालकांच्या काळात सुरक्षा कमी झाली आहे. नव्या पोलिस महासंचालकांना फक्त एवढ्याच कामासाठी आणले की काय? अशी शंका असल्याचेही विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारने सुरक्षेच्या बाबतीत घेतलेला निर्णय हा राजकिय निर्णय असल्याचाही आरोप त्यांनी केला. 

औरंगाबादच्या नामांतराच्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे. हिंदुरुदय सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भुमिकेची कृती व्हावी. हा विषय नुसता बोलून चालणार नाही तर नामांतराचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर आणायला हवा अशी अपेक्षाही विरोधी पक्षनेते दरेकर यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition Leader Praveen Darekar: Despite the threat posed to the Fadnavis by the Naxals, the government removed the security.