शिवसेनेत विरोधी पक्षनेतेपदाचा खेळ ! कागदोपत्री हंचाटे अन्‌ सभागृहात कोठे

2Tanaji_20Sawant_20_20Mahesh_20Kothe_20Solapur.jpg
2Tanaji_20Sawant_20_20Mahesh_20Kothe_20Solapur.jpg

सोलापूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. मात्र, सोलापूर महापालिकेचा अधिकृत विरोधी पक्षनेता कोण, हा वाद आता सुरु झाला आहे. तत्पूर्वी, तत्कालीन महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासमोर विरोधी पक्षनेतेपदाचा वाद आल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेता ठरविण्याचा अधिकार पक्षाला की त्यांच्या नगरसेवकांना, याबद्दल वैधानिक सल्लागारांकडून अभिप्राय घेण्याचे ठरविले. मात्र, तो अभिप्राय अद्याप आला नाही. मात्र, नगरोत्थानच्या निधी वाटपावरुन राजकुमार हंचाटे आक्रमक झाल्यानंतर शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकरांनी पत्र देऊन महेश कोठे हेच आमचे विरोधी पक्षनेते असल्याचे स्पष्ट केले आहे.


विधानसभा निवडणुकीत पक्षाविरुध्द बंडखोरी करण्याचा निर्णय महेश कोठे यांनी घेतला. त्यानंतर हंचाटे हे आमचे विरोधी पक्षनेते आहेत, असे पत्र तत्कालीन सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे- पाटील, जिल्हा सन्वयक शिवाजी सावंत, शहरप्रमुख हरिभाऊ चौगुले यांनी महापौरांना दिले. पत्राच्या आधारे हंचाटे यांनी सभागृहात उपसूचना मांडायला सुरवात केली. मात्र, महेश कोठे यांनी हरकत घेत आपणच विरोधी पक्षनेता असल्याचे सभागृहात स्पष्ट केले. पक्षातील नगरसेवकांनी आपल्याला विरोधी पक्षनेता म्हणून निश्‍चित केल्याचे कोठे यांनी त्यावेळी सांगितले. मात्र, हंचाटे यांनी पुन्हा हरकत घेतल्याने तत्कालीन महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासमोर पेच निर्माण झाला. त्यांनी विरोध पक्षनेता ठरविण्याचा अधिकार पक्षाला की पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, याबाबत वैधानिक सल्ला घेऊन निर्णय देण्याचे मान्य केले. मात्र, त्यानंतर अडीच वर्षाचा त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि वैधानिक सल्लाही गुंडाळल्याची चर्चा आहे.


"असा' निवडतात विरोधी पक्षनेता 
महापालिकेत दुसऱ्या क्रमांकावरील पक्षाचा विरोधी पक्षनेता केला जातो. मात्र, त्यासाठी पक्षाकडून महापौरांना पत्र दिले जाते. त्यानंतर सर्वसाधारण सभेत महापौर सभागृहात त्याचे वाचन करून विरोधी पक्षनेता ठरविला जातो. मात्र, राजकुमार हंचाटे व महेश कोठे यांच्यात नगरोत्थान योजनेच्या निधीवरुन वाद निर्माण झाल्यानंतर शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांनी 17 ऑगस्टला महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर व नगरसचिव कार्यालयास पत्र दिले. त्यानुसार धुत्तरगावकर म्हणाले, आमचे गटनेता व विरोधी पक्षनेते महेश कोठे हेच आहेत. त्यामुळे यापुढेही शिवसेनेतर्फे प्रत्येक निर्णय प्रक्रियेत प्रशासनाने त्यांच्याशीच संपर्क साधावा.


11 महिने उरले असतानाही दुसऱ्याला नाही संधी 
महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 रोजी होईल. तत्पूर्वी, नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अमोल शिंदे यांना विरोधी पक्षनेते करुन त्यांना महापालिकेची गाडी मिळवून देऊ, अशी ग्वाही महेश कोठे यांनी दिली. त्याची आठवण करुन देत हंचाटे म्हणाले, आता 11- 12 महिन्यानंतर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागेल. तत्पूर्वी, अमोल शिंदे यांना विरोधी पक्षनेतेपद देऊन महेश अण्णांनी त्यांचे आश्‍वासन पूर्ण करावे, त्याला आमचा विरोध नसेल. महेश कोठेंनी त्यांच्या ताकदीवर महापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता अशी अनेक पदे मिळविली आहेत. त्यांनी आता स्मार्ट सिटीचे संचालकपदाचा विचार न करता शिंदे यांना विरोधी पक्षनेते करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com