"त्या' बनावट दाखल्यांप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश ! भोसेकरांमध्ये "तो कोण'ची उत्सुकता 

हुकूम मुलाणी 
Friday, 22 January 2021

भोसे ग्रामपंचायतीसाठी पाच प्रभागांतून 57 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या उमेदवारांकडे शौचालय आहे, तशी नोंद ग्रामपंचायतीकडे आहे. तरीही छाननीच्या वेळी पाच प्रभागातील प्रभाग एकमध्ये तीन, प्रभाग दोनमध्ये चार, प्रभाग तीनमध्ये एक, प्रभाग चारमध्ये चार आणि प्रभाग पाचमधील सहा इतक्‍या उमेदवारांच्या अर्जांना हरकती घेण्यात आल्या होत्या. 

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील भोसे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या आखाड्यातील 14 उमेदवारांचे अर्ज विविध हरकती घेत अपात्र ठरविण्यात आले होते. परंतु हरकतीसाठी जोडलेल्या बनावट दाखल्यांप्रकरणी तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे बनावट दाखले देणारा तो कोण? याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

भोसे ग्रामपंचायतीसाठी पाच प्रभागांतून 57 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या उमेदवारांकडे शौचालय आहे, तशी नोंद ग्रामपंचायतीकडे आहे. तरीही छाननीच्या वेळी पाच प्रभागातील प्रभाग एकमध्ये तीन, प्रभाग दोनमध्ये चार, प्रभाग तीनमध्ये एक, प्रभाग चारमध्ये चार आणि प्रभाग पाचमधील सहा इतक्‍या उमेदवारांच्या अर्जांना हरकती घेण्यात आल्या होत्या. हरकतींमधील काही उमेदवारांकडे घेरडी ता. (सांगोला) येथे शौचालय आहे, परंतु भोसे येथे शौचालय नाही व काही उमेदवारांनी ग्रामपंचायतीकडे ठेकेदारी स्वरूपाचे काम केल्याचे पुरावे म्हणून ग्रामसेवकांचे दाखले जोडण्यात आले. 

या ग्रामपंचायतींकडे दोन ग्रामसेवकांनी कामकाज केले असून संबंधित ग्रामसेवकांनी दाखल्याबाबत हात वर केल्यामुळे हरकतीसाठी घेतलेले दाखले नेमके कुणाच्या सहीचे होते, हा प्रश्न अपात्र उमेदवारांना अर्ज छाननीच्या दरम्यान पडला. दरम्यान, याबाबत हरकतीसाठीचे ग्रामसेवकांसोबत झालेले फोन रेकॉर्ड व व्हॉट्‌सऍपवर टाकलेले मेसेजचे पुरावे तहसीलदारांना दाखवण्यात आले. परंतु हरकतीची वेळ निघून गेल्यामुळे सदरचे पुरावे फेटाळण्यात आले. 

त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने चौकशी आदेश दिल्यानंतर याबाबत चौकशी करण्यात आली. प्रभारी ग्रामसेवक दत्तात्रय इंगोले यांनी आपण दाखले दिले नसल्याचा अहवाल 5 जानेवारी रोजी दिला होता. सदरच्या बनावट दाखल्याप्रकरणी ग्रामसेवकामार्फत गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order to file a case against those who gave fake certificates in Bhose Gram Panchayat elections