
ठळक बाबी...
सोलापूर : बीड, नगरमार्गे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात आलेल्या बिबट्याने 16 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या काळात नऊजणांचा बळी घेतला आहे. तर तिघांना गंभीर जखमी केले आहे. नरभक्षक बिबट्या घातक ठरू लागल्याने संबंधित करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी बिबट्याला ठार करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वन विभागाकडे केली होती तर माजी आमदार नारायण पाटील यांनी वनमंत्र्यांनाच फोन केला होता. त्यानंतर रविवारी (ता. 6) राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी त्या बिबट्याला पिंजरा लावून तथा बेशुध्द करुन पकडणे शक्य नसल्यास गोळ्या घालून ठार करण्याची परवानगी दिली आहे.
ठळक बाबी...
नरभक्षक बिबट्याने शेतकरी व शेतमजुरांसह उसतोड कामगारांना शेतात जाणे मुश्किल केले आहे. झाडाआड प्रसंगी झाडावर लपून बसलेला बिबट्या अनेकांना दिसला, परंतु त्याला वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी पकडू शकलेले नाहीत. तत्पूर्वी, शेतात कामानिमित्त गेल्यानंतर तथा कामावरुन घरी परतताना बिबट्याने हल्ले केले आहेत. त्यात अल्का बडे (रा. जाटवाद, ता. शिरुर), शिलावती दिंडे (रा. मंगळूर, ता. आष्टी) व शिलाबाई भोसले (रा. पारगाव, ता. आष्टी) या गंभीर जखमी झाल्या आहेत. तर अशोक आवटे, कृष्णा आवटे (रा. आपेगाव, गोदावरी नदीकाठी उत्तरेस), छबुबाई राठोड (रा. भगवानगड तांडा, ता. पाथर्डी), नागनाथ गर्जे (रा. सुर्डी, ता. आष्टी), स्वराज भापकर (रा. किन्ही, ता. आष्टी), सुरेखा भोसले (रा. रा. पारगाव, ता. आष्टी), कल्याण फुंदे (रा. लिंबेवाडी, ता. करमाळा), जयश्री शिंदे (रा. अंजनडोह, ता. करमाळा)व फुलाबाई हरिचंद कोठले (उसतोड कामगाराची मुलगी) यांचा बिबट्याने बळी घेतला आहे. दरम्यान, बिबट्याला ठार करण्यासाठी पुणे व औरंगाबाद प्रादेशिक वन विभागीय कार्यालयाने प्राधिकृत केलेले वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी तथा अन्य व्यक्तींनाच परवानगी असेल, असेही श्री. काकोडकर यांनी स्पष्ट केले आहे.