आमदार राम सातपुते यांना होम क्वारंटाईन करण्याचा आदेश 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 8 May 2020

राष्ट्रवादीच्या मागणीचे दखल 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या मागणीची माळशिरसचे उपविभागीय अधिकारी यांनी दखल घेऊन माळशिरस येथे वास्तव्यास असलेल्या आमदार सातपुते यांना होम क्वारंटाईन करण्याचा आदेश माळशिरस नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना प्रांताधिकाऱ्यांनी बुधवार ता. 6 रोजी दिला. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

लवंग (ता. माळशिस, जि. सोलापूर) : माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांना तात्काळ होम क्वारंटाईन करण्याबाबत कार्यवाही करावी, असा आदेश प्रांताधिकारी शमा पवार यांनी माळशिरस नगरपंचायतचे मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. 
आमदार सातपुते माळशिरस तालुक्‍यामध्ये बीड, पुणे येथून आले आणि त्यांनी माळशिरस पंचायत समितीमध्ये कोरोनाच्या संदर्भात सर्व काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन माहिती घेतली. माळशिरस तालुक्‍यात इतर तालुका व जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करून क्वारंटाईन करावे, असा प्रशासनाने आदेश दिलेला असताना सातपुते यांची तपासणी अथवा कॉरन्टाईन का केले नाही. त्यांना कॉरन्टाईन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी लेखी निवेदन देऊन केली होती. 
आमदार राम सातपुते यांना एक न्याय व सर्वसामान्य माणसाला एक न्याय हे कशासाठी चालले आहे. असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे साठे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते. 
आमदार राम सातपुते हे या तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी आहेत. मात्र त्यांनी इतर जिल्ह्यातून प्रवास करुन येताच बैठक घेऊन अधिकारी यांच्याही अडचणीत भर टाकली. त्यांनी स्वतः क्वारंटाईन होणे गरजेचे होते, असे साठे यांनी निवेदनात म्हटले होते. आमदार राम सातपुते यांनी प्रथम 14 दिवस होम क्वारंटाईन होऊन क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर माळशिरस तालुक्‍यातील जनतेची सेवा करण्यासाठी मैदानात उतरावे, असे किरण साठे म्हणाले होते. त्यानुसार प्रातांधिकारी यांनी आमदार सातपुते यांना होम क्वारंटाईन करण्याचे आदेश माळशिरस नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order to MLA Ram Satpute to do home quarantine