उंबरगावच्या कुसुमडे सासू-सुनांची सेंद्रीय शेतीत भरारी, डाळिंब, बोर, पेरू, केशर आंबा, नारळ, सुपारी, चिकू, सीताफळ, रामफळ, चिंचेचे उत्पादन 

प्रमोद बोडके
Sunday, 10 January 2021

स्वयंपाकासाठी गोबरगॅस 

कुसुमडे परिवाराकडे असलेल्या शेळीपालन, खिलार गायी व म्हशींच्या शेणापासून गोबरगॅस तयार केला जातो. कुटुंबाच्या स्वयंपाकासाठी कुसुमडे परिवार याच गोबरगॅसचा वापर करत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील खर्चात मोठी कपात झाली आहे. गोबरगॅस तयार झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या स्लरीचा उपयोग शेतीमध्ये खतांसाठी केला जातो. त्यातून सुपिक शेतीला चालना मिळत आहे. 


  •  खिलार गाईचे तूप 3,200 रुपये किलो 

  • देशी अंड्याची दहा रुपयांना विक्री 

  • सेंद्रीय शेतीचा आणखी विस्तार करण्याचे नियोजन 

  • पंढरपुरात होते सेंद्रीय शेतमालाची विक्री 
  • रासायनिक खतांच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध 
  •  

सोलापूर : कोरोनाच्या संकटामुळे पौष्टिक खाद्य आणि रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्व सर्वांनाच समजले आहे. मोठ्या शहरात राहणाऱ्या फ्लॅटमधील व्यक्तींपासून ते खेडेगावातील वाड्या-वस्त्यावरील व्यक्तींना आता सदृढ आरोग्याचे महत्त्व अधिक पटले आहे. शेतीतून अधिक उत्पादन मिळविण्याच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा बेसुमार वापर सुरु झाला. त्याचा विपरित परिणाम मानवी आरोग्यावर होऊ लागला. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे उंबरगाव (ता. पंढरपूर) येथील सौ. सुमन कुसुमडे व सौ. काजल कुसुमडे यांनी सेंद्रीय शेतीत भरारी घेतली आहे. 

कुसुमडे परिवाराकडे असलेल्या सहा एकर सोळा गुंठे जमिनीत त्यांनी डाळिंब, बोर, पेरू, केशर आंबा, नारळ, सुपारी, चिकू, सीताफळ, रामफळ, चिंच यासह इतर फळांचे सेंद्रीय पध्दतीने उत्पादन घेतले जाते. सेंद्रीय पद्धतीच्या शेतीतून उत्पन्नाचा नवीन मार्ग व कुटुंबासाठी आरोग्यदायी अन्न त्यांनी तयार केले आहे. कुसुमडे सासू, सुना शेतीसोबतच खिलार गायींचे संगोपन, शेळीपालन व देशी कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत. शेतीसाठी लागणारे शेणखत, लेंडीखत हे त्यांच्याकडे तयार होते. याशिवाय गांडूळ खताच्या माध्यमातूनही शेतीला सेंद्रीय खते दिली जातात. 

सौ. सुमन कुसुमडे व सौ. काजल कुसुमडे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. तरी देखील बदलत्या काळानुसार या सासू, सुनांनी शेतीत केलेला बदल हा कौतुकास्पद आहे. सौ. सुमन कुसुमडे या गेल्या वीस वर्षांपासून कुसुमडे परिवारातील शेतीची संपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. सौ. सुमन कुसुमडे यांचे पती शामराव कुसुमडे हे माजी सैनिक आहेत. सेंद्रीय शेतीसाठी त्यांची प्रेरणा मोलाची ठरली. काजल यांच्यासोबतच जयश्री आणि पूजा या सुनांचादेखील सौ. सुमन कुसुमडे यांना हातभार लागत आहे. 2011 मध्ये विवाह करून त्यांच्या कुटुंबात आलेल्या काजल यांची मोठी साथ सौ. सुमन कुसुमडे यांना मिळत आहे. या सासू, सुनांनी सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून वेगळा प्रयोग उंबरगावसारख्या ग्रामीण भागात यशस्वी करून दाखवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Organic Farming of Kusumade family of Umbergaon

टॉपिकस
Topic Tags: