esakal | क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातून सोलापूरी पर्यटनाला मिळेल चालना

बोलून बातमी शोधा

sports logo.jpg}

कॉफी विथ सकाळ उपक्रमात सहभागी झालेल्या क्रीडा संघटना पदाधिकाऱ्यांनी त्यांची मते मांडली. 

क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातून सोलापूरी पर्यटनाला मिळेल चालना
sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर, ः शहरामध्ये अनेक खेळाडू हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत आहेत. सोलापुरात राज्य व राष्ट्रीय क्रिडा स्पर्धाचे आयोजन सातत्याने झाले तर राज्य व देशभरातून येणाऱ्या खेळाडूंच्या माध्यमातून सोलापूरी पर्यटन घरोघरो पोहोचण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी भव्य इनडोअर स्टेडियम व एक हजार खेळाडू थांबू शकतील अशा दोन सुविधांची प्राधान्याने गरज आहे असे मत क्रिडा संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. . 

कॉफी विथ सकाळ उपक्रमात सहभागी झालेल्या क्रिडा संघटना पदाधिकाऱ्यांनी त्यांची मते मांडली. 

पर्यटनाला मिळेल चालना 
राज्य व राष्ट्रीय स्पर्धाच्या माध्यमातून हजारो खेळाडू शहरात येत असतात. सामने संपल्यानंतर किंवा उर्वरित वेळेत हे खेळाडू जिल्ह्यतील पर्यटनस्थळांना भेट देतात. तसेच येथील खाद्य संस्कृतीचा परिचय त्यांना होतो. त्यानंतर हे खेळाडू नंतरच्या काळात देखील सोलापूर शहराला पर्यटक म्हणून भेट देतात हा अनुभव आहे. या माध्यमातून केवळ राज्य नव्हे तर देशात सोलापूरचे पर्यटन पोहोचत आहे. त्यामुळे मोठ्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन सातत्याने पर्यटनाला चालना देणारे ठरले आहे. 

फुटबॉल विकासाला चालना 
शहरात फुटबॉलसाठी 16 क्रीडांगणे आहेत. संतोष ट्रॉफीचे सामने देखील 2019 घेतले गेले. वीफा (वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन) ने विशेष प्रशिक्षणात सोलापूरचा समावेश केला आहे. इंडियन आय लीगमध्ये किरण पांढरे,ओंकार मस्के यांनी चांगली कामगिरी केली. 

तलवारबाजीमध्ये आयोजनाला संधी 
तलवारबाजी खेळाला ऑलम्पिक दर्जा मिळाला आहे. सोलापूरमध्ये 28 सीनियर राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सर्व राज्यातील 900 खेळाडू सहभागी झाले होते. श्वेता मालक, पवन भोसले, साक्षी सिंगल, ऋषिकेश आर्कुट, राष्ट्रीय पंच अक्षय माने आदींची कामगिरी उठावदार आहे. 

कुस्तीची परंपरा मोठी 
शहरासोबत ग्रामीण भागात कुस्त्यांना वाढता प्रतिसाद आहे. आधुनिक प्रशिक्षणासाठी सोलापुरातील पैलवान पुणे व कोल्हापूर येथे सरावाला जात असतात. शहरांमध्ये 25 तालीमकडून कुस्त्यांचे प्रशिक्षण घेतले जाते. तीन वर्ष कामगार केसरी स्पर्धा सोलापुरात झाली. रविराज सरवदे, गणेश जगताप, वेताळ शेळके, स्वप्निल काशीद, स्नेहा कदम या खेळाडूंनी नाव कमावले आहे. 

हॅंडबॉल खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर 
सोलापूरला हॅंडबॉल खेळांचा चांगल्या पध्दतीने विकास झाला आहे. आतापर्यंत आठ ते नऊ वेळा राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थानिक खेळांडूनी मोठी कामगिरी केली आहे. श्रेयस मालप हा पाकिस्तान येथील स्पर्धेत खेळला. 

बॉल बॅडमिंटन व खोखोच्या राष्ट्रीय स्पर्धा व्हाव्यात 
2018 सोलापूर मध्ये राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा झाली होती. एकूण आठ मैदाने या खेळासाठी वापरले जातात. बॉल बॅडमिंटनमध्ये आराधना राठोड व तेजस केदार, योगीराज कलबुर्मे, खोखो मध्ये देखील सोलापूरचा संघ राज्यात पहिल्या चार क्रमांकामध्ये हमखास असतो. कबड्डीमध्ये देखील सोलापूरचे खेळाडू मोठी कामगिरी करत आहेत. 

क्रीडा क्षेत्राचे बलस्थान क्रीडा फेडरेशन 
क्रीडा फेडरेशन ही संघटना एकमेव सर्व क्रीडा प्रकार व संघटनाचे व्यासपीठ आहे. या माध्यमातून कोणत्याही खेळाच्या स्पर्धा व विकासाला एकत्रीत टीमकडून चालना मिळते. या पध्दतीने सोलापूरच्या क्रीडा क्षेत्राचा फेडरेशन पॅटर्न महत्वाचा ठरतो. माजी महापौर तथा शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त रणजीपटू प्रा.डॉ. पुरणचंद्र पुंजाल हे फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. 

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मुळे सोलापूर आता जगाच्या क्रिकेटक्षेत्रात नाव करणार आहे. एका अर्थाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. 
- चंद्रकांत रेंबर्सु, सेक्रेटरी, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन, सोलापूर. 

महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची तयारी
सोलापुरात महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची तयारी संघटनेची आहे. कुस्तीसाठी अद्ययावत सुविधांची गरज सातत्याने भासते आहे. 
- भरत मेकाले, राज्य कुस्तीगिर परिषद 

आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन शक्‍य
चौदा देशात खोखो खेळवला जात असल्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन करता येणे शक्‍य होणार आहे. 
- महेश गादेकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तथा उपाध्यक्ष, राज्य खोखो असोसिएशन 

मोठ्या आयोजनाला संधी
तलवारबाजीच्या स्पर्धाचा वाढता सहभाग पुढील काळात मोठ्या आयोजनाला संधी देणारा ठरेल. 
- प्रकाश काटुळे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तथा अध्यक्ष महाराष्ट्रराज्य तलवारबाजी असोसिएशन 

राष्ट्रीय गुणवत्ता समजण्याची संधी 
सोलापुरातील अडीच हजार खेळाडूंना राष्ट्रीय गुणवत्ता समजून घेण्याची संधी स्पर्धा व प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळू शकते. 
- प्रा.आनंद चव्हाण, संचालक, महाराष्ट्र राज्य हॅंडबॉल असोसिएशन 

फुटबॉल विकासाची मोठी संधी
फुटबॉलच्या संदर्भात वीफा या राज्य संघटनेने सोलापूरची विशेष प्रकल्पासाठी निवड केल्याने फुटबॉल विकासाची मोठी संधी आहे. 
- प्रा. डॉ. किरण चौगुले, सहसचिव, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन 

 स्पर्धाचे आयोजन वाढावे
बॉल बॅडमिंटनच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन सोलापुरात सातत्याने होणे गरजेचे आहे. 
- राजेंद्र माने, सचिव, सोलापूर शहर व जिल्हा बॉल बॅडमिंटन संघटना