ग्रामीणमध्ये कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींना इतरही आजार 

प्रमोद बोडके
Monday, 22 June 2020

आरोग्य यंत्रणा सज्ज 
कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे तीन हजार 77 पल्स ऑक्‍सिमीटर आणि तीन हजार 920 थर्मल स्कॅनर सध्या उपलब्ध आहेत. जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांसोबत 345 खासगी रुग्णालये अधिग्रहीत केली असून 446 डॉक्‍टर देखरेख करीत आहेत. दोन हजार 558 बेडची संख्या असून 131 आयसीयू बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. गंभीर रुग्णांसाठी 44 व्हेंटिलेटर आणि 24 ऑक्‍सिजनची सोय करण्यात आली असून ग्रामीण भागातील मृत्युदर शून्यावर आणणार असल्याचे डॉ. जमादार यांनी सांगितले. 

सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. रुग्णसंख्या कमी करण्यासोबतच मृत्युदर कमी करण्यासाठी विशेष उपाययोजनांवर भर देण्यात येत असून कोरोनाशिवाय इतर आजारी रुग्णांची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. ग्रामीण भागातील मृत पावलेल्या 11 रुग्णांना इतर आजार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. 

विरळ लोकसंख्या आणि घरांमधील जास्त अंतर, हे कोविड-19चा प्रादुर्भाव शहरापेक्षा ग्रामीण भागात कमी असल्याचे कारण आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात अधिकाऱ्यांच्या नियंत्रण टीम तयार केल्या आहेत. ग्रामसमिती आणि अधिकाऱ्यांच्या टीमच्या माध्यमातून बाहेरून आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार म्हणाले, जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी पंढरपूर पॅटर्न राबवून रुग्णसंख्या कमी करण्याचा प्रयत्न आहे. कॅन्सर, दमा, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, वयोवृद्ध अशा नागरिकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात 13 हजार पथके करण्यात आली आहेत. आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी आणि इतरांना थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्‍सिमीटर देण्यात आलेले आहेत. त्यांच्या साहाय्याने तालुका, गावनिहाय घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. थर्मल स्कॅनच्या माध्यमातून तापमान, पल्स ऑक्‍सिमीटरच्या माध्यमातून रुग्णांच्या रक्तांमधील ऑक्‍सिजनचे प्रमाण समजणार आहे. 

आजार, वयनिहाय सर्वेक्षण 
ग्रामीण भागातील सर्वेक्षणातून आजार, वयनिहाय यादी करण्यात आली असून याचा उपयोग गंभीर आजारी रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी होणार असल्याचे डॉ. जमादार यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागात पहिला रुग्ण 24 एप्रिलला घेरडी (ता. सांगोला, मुंबईवरून आलेला) येथे मिळून आला. याच्या अगोदरपासून परगावाहून आलेल्या प्रत्येकांना होम क्वारंटाइन, संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात 204 कोरोनाबाधित रुग्ण आहेत, यापैकी 87 बरे होऊन घरी गेले तर 106 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 12 मयत (यापैकी एक अपघात) झाले असून जिल्ह्यात चार गंभीर रुग्ण आहेत. जिल्ह्यातील सर्वेक्षणासाठी 13 हजार टीम तयार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Other diseases affect people who have died of corona in rural areas