
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राकडे त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोरोनामुक्त व्यक्तींची माहिती, कोरोनामुक्त झालेल्या को-मॉर्बिड व्यक्तींची माहिती आहे. याशिवाय मेडिकल स्टोअर, खासगी दवाखाने या माध्यमातून देखील माहिती संकलित करून ही संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आली आहे. आरोग्यवर्धिनीच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी योगासने व प्राणायामचे शिबिर नियमितपणे आयोजित केले जात आहे. या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील व्यक्तींना योगासन व प्राणायामची माहिती दिली जात आहे.
- डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात घटली आहे. सध्या जिल्ह्यात रोज सरासरी दीडशे ते दोनशेच्या आसपास नव्या रुग्णांची भर पडत आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना योग्य उपचार, योग्य मार्गदर्शन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सर्व 77 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना पश्चात बाह्यरुग्णसेवा सुरू करण्यात आली आहे.
सौम्य/किरकोळ प्रकारचा त्रास (थकवा, अंगदुखी) असणाऱ्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर उपचार केले जाणार आहेत. तीव्र/गंभीर स्वरूपाचा त्रास असल्यास अथवा गुंतागुंत असलेल्या रुग्णांना तातडीने संदर्भ सेवेसाठी पाठविण्याच्या सूचना प्राथमिक आरोग्य केंद्रांना करण्यात आल्या आहेत. वैयक्तिक स्वच्छता, वारंवार हात धुणे, मास्कचा नियमित वापर, सामाजिक अंतर ठेवणे याबाबत रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांची प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर समुपदेशन केले जात आहे.
योग, प्राणायाम, श्वसनाचे व्यायाम, हलका व्यायाम नियमित करण्याबाबत रुग्ण व नातेवाईकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. सकस व समतोल आहार नियमितपणे घेण्याबाबतही रुग्ण व नातेवाईकांना मार्गदर्शन केले जात आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रचलित आयुष उपचार पद्धतीचा अवलंब याबाबत देखील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कोरोना मुक्तीनंतर हृदयविकाराचा अधिक धोका
कोरोनामुक्त झाल्यानंतर मृत्यू झाल्याच्या अनेक घटना सोलापूर शहर व जिल्ह्यात घडल्या आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्या व्यक्तींला हृदयविकाराचा झटका येत असल्याचे प्रकर्षाने दिसत आहे. त्यासाठी कोरोनामुक्तीनंतर देखील काही पत्थ पाळणे, वैद्यकीय सल्ल्यानुसार आहार, व्यायाम करणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली.