सरकारने पुसली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने ! शेतकरी व शेतकरी संघटनांमधून तीव्र नाराजी 

भारत नागणे 
Saturday, 24 October 2020

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या भरीव मदतीची गरज असताना सरकारने तोकडी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, अशी प्रतिक्रिया विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या भरीव मदतीची गरज असताना सरकारने तोकडी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, अशी प्रतिक्रिया विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

मागील चार दिवस राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह मंत्री नुकसानीची पाहणी करत आहेत. पाहणी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी आशा केली जात होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फळबागांसाठी एकरी दहा हजार तर बागायती पिकांसाठी केवळ चार हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतीविषयी शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

बळिराजा शेतकरी संघटना
सरकारने केवळ अत्यंत तोकडी मदत जाहीर करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. सरसकट हेक्‍टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी; अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांनी दिला आहे. 

रयत क्रांती
मागील दोन वर्षांपूर्वी अत्यंत कमी नुकसान झालेले असताना देखील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयांची मदत दिली होती. घरात पुराचे पाणी आलेल्या पूरग्रस्तांना 15 हजार रुपयांची मदत दिली होती. शेतकऱ्यांना हेक्‍टरी 40 हजार रुपयांची मदत दिली होती. शेतकऱ्यांच्या जिवावर राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना अत्यंत कमी मदत जाहीर केली आहे. सरकारने येत्या आठ दिवसांत मदत वाढवून दिली नाही तर रयत क्रांती संघटनेच्या वतीने राज्यभरात आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा रयत क्रांतीचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी दिला आहे. 

मनसे
राज्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतीमुळे शेतकरी उभा राहू शकणार नाही. यापूर्वीच मसनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरसकट एकरी 25 हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. परंतु सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकारने शेतकऱ्यांना अधिक मदत वाढवून द्यावी, अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केली आहे. 

शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, केळी, पपई अशा विविध फळबागांसह ऊस, मका, बाजरी, तूर या पिकांचे नुकसान झाले आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत जाहीर केली नाही. अत्यंत कमी मदत जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याची भावना डाळिंब उत्पादक शेतकरी मोहन घोलप, बाळासाहेब पवार या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकूणच सरकारने जाहीर केलेल्या मदतीविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Outrage is being expressed against the government for announcing less aid to the affected farmers