esakal | सिमला मिरची पिकविणाऱ्या पडसाळीने घडवला इतिहास ! स्थापनेपासून पहिल्यांदाच झाली ग्रामपंचायत बिनविरोध 
sakal

बोलून बातमी शोधा

Padsali GP.

उत्तर सोलापूर तालुक्‍याच्या टोकाला असलेलं पडसाळी हे दुष्काळग्रस्त गाव. मातीतून मोती पिकविणाऱ्या येथील शेतकरी बांधवांनी विजेच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि त्या विजेच्या प्रश्नातच गावची निवडणूक बिनविरोध करून गावाच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच पडसाळी गावची निवडणूक बिनविरोध झाल्याने तालुक्‍यासह जिल्ह्यातील नागरिकांमधून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

सिमला मिरची पिकविणाऱ्या पडसाळीने घडवला इतिहास ! स्थापनेपासून पहिल्यांदाच झाली ग्रामपंचायत बिनविरोध 

sakal_logo
By
संतोष सिरसट

उत्तर सोलापूर (सोलापूर) : उत्तर सोलापूर तालुक्‍याच्या टोकाला असलेलं पडसाळी हे दुष्काळग्रस्त गाव. मातीतून मोती पिकविणाऱ्या येथील शेतकरी बांधवांनी विजेच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि त्या विजेच्या प्रश्नातच गावची निवडणूक बिनविरोध करून गावाच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच पडसाळी गावची निवडणूक बिनविरोध झाल्याने तालुक्‍यासह जिल्ह्यातील नागरिकांमधून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. सिमला मिरचीचे आगर म्हणून ओळख असलेल्या पडसाळीने गावची निवडणूक बिनविरोध करून शेतीच्या प्रश्नासाठी वाटेल ते करण्याची तयारी दाखवल्याची चर्चा तालुक्‍यात सुरू आहे. 

पडसाळी गावाला कोणत्याही प्रकारचा पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. तरीही आहे त्या पाण्यावर चांगल्या पद्धतीची शेती करून कमी क्षेत्रात जास्त उत्पादन मिळविण्यावर गावकऱ्यांचा कल असतो. मागील तीन-चार वर्षांपासून ढोबळी मिरची हे पीक या गावातील प्रमुख पीक बनले. जवळपास 400 ते 500 एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीची लागवड झाली. नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या या मिरचीने गावकऱ्यांना भरभरून पैसे दिले. त्या पैशाच्या जोरावर वाटेल ते करण्याची तयारी ग्रामस्थांची होती. मात्र विजेच्या प्रश्नासाठी सर्वजण एकत्र येत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली. 

ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत पडसाळी या गावाला केवळ चार तास वीज मिळत होती. त्याचा मानसिक, आर्थिक, शारीरिक त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत होता. विजेच्या प्रश्नासाठी वाटेल ते करण्याची तयारी ग्रामस्थांनी केली होती. आमदार यशवंत माने, जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते बळिराम साठे यांनी गावामध्ये येऊन विजेचा प्रश्‍न जाणूनही घेतला होता. त्या वेळी गावकरी विजेच्या प्रश्नासाठी आक्रमक झाल्याचे या दोन्ही नेत्यांनी पाहिले होते. विजेचा प्रश्‍न बिकट आहे आणि त्यावर यशस्वीपणे तोडगा काढणे अपेक्षित असल्याचा मुद्दा गावातील काही जाणकारांच्या लक्षात आला. त्यांनी हा मुद्दा गावकऱ्यांशी चर्चा करून सोडवण्याचा निश्‍चय केला. विजेचा प्रश्न मार्गी लागतोय म्हटल्यावर ग्रामस्थांनी नरमाईची भूमिका घेत गाव बिनविरोध करण्यावर भर दिला. यासाठी पुढाकार घेणाऱ्यांना गावाने संपूर्ण सहकार्याची हमी दिली आणि त्या वेळीच ढोबळी मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या पडसाळी गावात इतिहास घडला. 

आमदार माने यांचं स्वप्न सत्यात उतरवलं 
आमदार यशवंत माने यांनी ग्रामपंचायत बिनविरोध करणाऱ्या गावासाठी 21 लाख रुपये निधीची घोषणा केली होती. त्यांनी केलेली घोषणा ही पडसाळी ग्रामस्थांच्या मनामध्ये घर करून राहिली. काहीही झाले तरी गाव बिनविरोध करून 21 लाखांचे बक्षीस मिळवायचं आणि आपल्या गावच्या विजेचा प्रश्न सोडवायचा, यावर ग्रामस्थ ठाम होते आणि आमदार माने यांचं स्वप्न गावकऱ्यांनी सत्यात उतरवलं. 

पडसाळी गावचा भूतकाळ पाहिला तर या गावाला फारसं चांगलं स्थान तालुक्‍यात नव्हतं. मात्र या गावातील तरुणांनी शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल केल्याने ढोबळी मिरचीच्या रूपाने गावाची ओळख महाराष्ट्राबाहेर झाली. राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात,आंध्र प्रदेश, तेलंगण, हरियाणा या राज्यांमध्ये गावातील ढोबळी मिरची विक्रीसाठी जाऊ लागली. त्यातून गावकऱ्यांना चांगला पैसाही मिळाला. पैसा मिळाला, त्या पैशाचा सदुपयोग गावकऱ्यांनी ग्रामपंचायत बिनविरोध करून केला आहे. 

बिनविरोध निवडून आलेले सदस्य 
अजित सिरसट, स्वाती सिरसट, धर्मा रोकडे, माणिक राऊत, जोशना पाटील, सीमिंताबाई भोसले, महादेव भोसले, रेणुका माळी, तबस्सुम शेख. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल