डाळिंबाला उच्चांकी 101 रुपयांचा भाव ! लॉकडाउननंतर पंढरपूर बाजार समितीमध्ये खरेदी-विक्री सुरू 

भारत नागणे 
Thursday, 8 October 2020

लॉकडाउननंतर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल खरेदी- विक्रीला गती आली आहे. मंदावलेल्या बाजारात तब्बल सहा महिन्यांनंतर डाळिंब, बेदाणा, केळी, पपई यांसारख्या फळांचे दर वाढू लागले आहेत. बुधवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भगवा जातीच्या डाळिंबाला प्रतिकिलो 101 रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. लॉकडाउननंतर बाजारात डाळिंबाला सर्वाधिक भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

पंढरपूर (सोलापूर) : लॉकडाउननंतर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल खरेदी- विक्रीला गती आली आहे. मंदावलेल्या बाजारात तब्बल सहा महिन्यांनंतर डाळिंब, बेदाणा, केळी, पपई यांसारख्या फळांचे दर वाढू लागले आहेत. बुधवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भगवा जातीच्या डाळिंबाला प्रतिकिलो 101 रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. लॉकडाउननंतर बाजारात डाळिंबाला सर्वाधिक भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. यामध्ये सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. वाहतूक आणि बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतीमालाचे भाव गडगडले होते. शेतकऱ्यांना आपला शेतमाल बांधावर फेकून द्यावा लागला होता. केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक पाच जाहीर केल्यानंतर सर्व व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहेत. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांही सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती डाळिंब सौदे बाजारासाठी पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथे कर्नाटकसह सोलापूर, सातारा, सांगली, नगर या भागातील शेतकरी डाळिंब विक्रीसाठी येतात. दररोज येथे जवळपास आठ ते दहा हजार क्रेट डाळिंबाची आवक होते. बुधवारी येथील डाळिंब सौदे बाजारात आठ हजार क्रेट डाळिंबाची आवक झाली. यामध्ये लोणारवाडी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी नवनाथ गोडसे यांच्या भगवा जातीच्या डाळिंबाळा प्रतिकिलो 101 रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला. येथील डाळिंब व्यापारी शब्बीर भगवान यांच्या आडत दुकानात श्री. गोडसे यांच्या डाळिंबाला हा उच्चांकी भाव मिळाला. गोडसे यांनी एक टन डाळिंब विक्रीसाठी आणले होते. यामधील 40 किलो डाळिंबाला उच्चांकी 101 रुपयांचा दर मिळाला. तर 239 किलो डाळिंबाला 95 रुपयांचा दर मिळाला. 

त्या खालोखाल विनोद थोरात यांच्या डाळिंबाला प्रतिकिलो 90 रुपयांचा भाव मिळाला. सौदे बाजारात चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला 101 ते 90 रुपये तर कमी प्रतीच्या डाळिंबाला सरासरी प्रतिकिलो 55 रुपये भाव मिळाला. बाजारात डाळिंबाचे भाव वाढल्याने ऐन संकट काळात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. 

बाजारात उच्चांकी दर मिळाल्याबद्दल नवनाथ गोडसे आणि विनोद थोरात या शेतकऱ्यांचे बाजार समितीचे संचालक आमदार प्रशांत परिचारक, संचालक उमेश परिचारक, उपसभपाती विवेक कचरे यांनीही अभिनंदन केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pandharpur Bazar Samiti Pomegranate got the highest price