esakal | शेतकऱ्यांना दिलासा; पंढरपूर बाजार समितीत आता वजनावरच होणार केळीची खरेदी 
sakal

बोलून बातमी शोधा

Pandharpur market committee will now buy bananas on weight

बाजार समितीमध्ये यापूर्वी कमी प्रतिच्या केळीची खरेदी ढिगावर केली जात होती. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे केली होती. या तक्रारीची बाजार समितीने गंभीर दखल घेवून आज तातडीने शेतकरी, व्यापारी आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेवून चर्चा केली.

शेतकऱ्यांना दिलासा; पंढरपूर बाजार समितीत आता वजनावरच होणार केळीची खरेदी 

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यापुढे केळीची खरेदी ही वजनावर करावी, अशा सक्त सूचना बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी आज दिल्या आहेत. बाजार समितीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. 

बाजार समितीमधील व्यापारी, शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधीची बैठक झाली. त्यामध्ये सभापती श्री. घाडगे यांनी व्यापाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उद्यापासून वजनावरच केळीसह इतर शेतीमालाची खरेदी केली जाणार आहे. येथील बाजार समितीमध्ये डाळिंब, कांद्यासह केळीची आवक होते. अलीकडच्या काही दिवसामध्ये केळीची आवक वाढली आहे. यापूर्वी कमी प्रतिच्या केळीची खरेदीही ढिगावर केली जात होती. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे केली होती. 

या तक्रारीची बाजार समितीने गंभीर दखल घेवून आज तातडीने शेतकरी, व्यापारी आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेवून चर्चा केली. यावेळी शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये समन्वय साधून शेतकऱ्यांचा अधिक फायदा कसा होईल, या विषयी सांगोपांग चर्चा झाली. केळीची खरेदी वजन करुनच करावी, ढिगावर खरेदी केल्यास संबंधित व्यापाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सभापती श्री. घाडगे यांनी दिला. यावेळी बाजार समितीचे उपसभापती विवेक कचरे, सचिव कुमार घाडगेंसह शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

संपादन : वैभव गाढवे 

go to top