
सहा लाख रुपयांची मागणी करत अकोला जिल्ह्यातील एका ट्रॅक्टर मुकादम व्यावसायिकाला त्याच्याशी परिचित बीड जिल्ह्यातील एकाने चारचाकी वाहनातून पळवून नेले होते. संबंधित संशयित आरोपी आणि पळवून आणलेली व्यक्ती पंढरपूर येथे असल्याचे मोबाईल लोकेशन मिळाल्यावर पंढरपूर पोलिसांनी रविवारी (ता. 21) आरोपीस पकडून अपहृत व्यक्तीची सुटका केली.
पंढरपूर (सोलापूर) : सहा लाख रुपयांची मागणी करत अकोला जिल्ह्यातील एका ट्रॅक्टर मुकादम व्यावसायिकाला त्याच्याशी परिचित बीड जिल्ह्यातील एकाने चारचाकी वाहनातून पळवून नेले होते. संबंधित संशयित आरोपी आणि पळवून आणलेली व्यक्ती पंढरपूर येथे असल्याचे मोबाईल लोकेशन मिळाल्यावर पंढरपूर पोलिसांनी रविवारी (ता. 21) आरोपीस पकडून अपहृत व्यक्तीची सुटका केली.
या घटनेची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की अकोला जिल्ह्यातील सुरेश मोदे (वय 54) हे ट्रॅक्टर मुकादम आहेत. त्यांच्या आणि संशयित आरोपी राजाभाऊ इंगळे (रा. छोटेवाडी, ता. माजलगाव, जि. बीड) याच्यामध्ये आर्थिक व्यवहार होता. सुरेश मोदे यांनी संशयित आरोपी इंगळे याला सहा लाख रुपये दिले नाहीत म्हणून इंगळे आणि त्याच्या पाच - सहा साथीदारांनी मोदे यांना चारचाकी गाडीसह पळवून आपल्या ताब्यात ठेवले होते.
मोदे यांना घेऊन आरोपी हे वाहनातून वेगवेगळ्या गावांना फिरत होते. या प्रकरणी मोदे यांच्या कुटुंबीयांनी संशयित आरोपी इंगळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिस संबंधितांचा शोध घेत असताना त्यांचे मोबाईल लोकेशन पंढरपूर येथे दिसून आले. पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक अरुण पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदुम, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. जगदाळे, उपनिरीक्षक प्रशांत भागवत यांनी तातडीने संबंधित वाहनाचा शोध घेऊन संशयित आरोपी इंगळे याच्या ताब्यातून सुरेश मोदे यांची सुटका केली. या प्रकरणात आरोपी इंगळे याला साथ देणाऱ्या अन्य लोकांचा पोलिस शोध घेत आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल