
पंढरपूर (सोलापूर) : शेती पंपाचे आणि घरगुती वापराचे थकीत वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजप आणि मनसे आक्रमक झालेली असतानाच, आज (गुरुवारी) महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना झटका दिला आहे. गेल्या पाच वर्षांनंतर प्रथमच आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज कापल्याने शेतकऱ्यांमधून सरकार विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
पंढरपूर तालुक्यातील चळे व परिसरातील सहा गावांतील सुमारे 80 हून अधिक थकबाकीदार शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा आज वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा तोडला आहे. शेतकऱ्यांच्या वीज पंपाचा वीज पुरवठा बंद केल्यामुळे मनसे आणि वीज वितरण कंपनीच्या आधिकाऱ्यांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
सततचा दुष्काळ, अतिवृष्टी आणि महापूर अशा नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात आहे. शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यातच लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचा पाय अधिकच खोलात गेला आहे. अशा संकट काळात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे आणि घरगुती वापराचे वीज बिल माफ करावे या मागणीसाठी भाजपने अलीकडेच राज्यभरात महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन केले होते. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनीही वीज बिल माफीसाठी राज्यभरात आंदोलन करून सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर राज्यातील एकाही शेतकऱ्याच्या शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही, असे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. परंतु आता थकबाकी वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने वीज तोडणीची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन फोल ठरले आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात आघाडी सरकारने सुरू केलेल्या कारवाईच्या विरोधात आता मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
चळे ( ता.पंढरपूर) येथील वीज उपकेंद्रा अंतर्गत येणार्या चळेसह सहा गावातील सहा डीपी बंद केले आहेत. यामध्ये 80 ते 90 शेतकर्यांच्या शेतीपंपाची वीज तोडली आहे.
याबाबत चळे येथील शाखा अभियंता पी. आर. गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले की, चळेसह इतर सहा गावांतील 60 हून अधिक थकबाकीदार शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज तोडली आहे. एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद केला आहे. कृषी धोरण 2020 अंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना 50 टक्के वीज बिल माफी जाहीर केली आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
दरम्यान, शेतीपंपाचा खंडित केलेला वीज पुरवठा तातडीने सुरू करावा; अन्यधा वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिला आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.