करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालून तीन जणांचा बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्याची दहशत पाहावयास मिळाली होती. काही दिवसांपूर्वी त्या बिबट्याला मारण्यास वनविभागाला यश आले. मात्र रविवारी रात्री पंढरपूर तालुक्यातील आव्हे येथे वासराला ठार मारण्यात आलेल्या या घटनेने आव्हे भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पटवर्धन कुरोली (सोलापूर) : पंढरपूर तालुक्यातील आव्हे येथे अज्ञात वन्य प्राण्याने हल्ला करून एका वासरूला ठार केल्याची घटना रविवारी (ता. 3) रात्री घडली. या घटनेमुळे आव्हे परिसरासह आसपासच्या पटवर्धन कुरोली, पेहे, नांदोरे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नेमका हल्ला कुठल्या प्राण्याने केला, हे मात्र समजू शकले नाही.
आव्हे येथील शेतकरी सदाशिव नाना पाटील हे आपल्या कुटुंबासह अंबाबाईच्या माळाजवळ शेतात राहतात. त्यांच्याकडे एक देशी गाय, एक वासरू, एक म्हैस व एक रेडी अशी अशी जनावरे आहेत. ही जनावरे ते एकाच ठिकाणी उघड्यावर बांधतात. रविवारी रात्री त्यांनी सर्व जनावरांना वैरण टाकली होती. पहाटे ते उठल्यानंतर देशी गायीच्या वासराला अज्ञात प्राण्याने ठार मारून खाल्ल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
महादेव पाटील यांनी घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली. कुठल्या प्राण्यांचे ठसे मिळतात का, याची पाहणी केली. परंतु, या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या प्राण्याचे ठसे मिळून आले नाहीत. प्राथमिक अंदाजानुसार वासरावर हल्ला करणारा वन्यप्राणी असू शकतो, असे वनसेवक जावेर मुलाणी यांनी सांगितले.
करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालून तीन जणांचा बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्याची दहशत पाहावयास मिळाली होती. काही दिवसांपूर्वी त्या बिबट्याला मारण्यास वनविभागाला यश आले. मात्र रविवारी रात्री पंढरपूर तालुक्यातील आव्हे येथे वासराला ठार मारण्यात आलेल्या या घटनेने आव्हे भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कुठल्याही वन्य प्राण्यांचे ठसे मिळून न आल्यामुळे वासरावर नेमका कुठल्या प्राण्याचे हल्ला केला असावा, याबाबत तालुक्यात संभ्रमावस्थेसह भीतीचे वातावरण पसरल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
महाराष्ट्र