पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : गोवा बनावटीच्या अवैध दारूसह 4 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त ! 

भारत नागणे 
Thursday, 10 September 2020

हिवरे (ता. माढा) येथून मेडसिंगीकडे (ता. सांगोला) जाणाऱ्या एका टेम्पोमधून अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री पोलिसांनी मुंढेवाडी परिसरात सापळा रचला. दरम्यान, एक संशयित टेम्पो भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून आले. या वेळी पोलिसांनी पाठलाग करून टेम्पो अडवला. टेम्पोची तपासणी केली असता, कडब्याच्या पेंड्यांमध्ये गोवा बनावटीच्या 30 बॉक्‍समध्ये एक हजार 440 अवैध दारूच्या बाटल्या लपवून ठेवल्याचे आढळून आले. 

पंढरपूर (सोलापूर) : कडब्याच्या पेंड्यांमध्ये अवैध दारूची वाहतूक करणारा एक टेम्पो पोलिसांनी बुधवारी (ता. 9) रात्री मोठ्या शिताफीने पकडला. कारवाई दरम्यान दोन लाख 16 हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूसह चार लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पंढरपूर तालुका पोलिसांनी मुंढेवाडी (ता. पंढरपूर) परिसरात केली. अवैध दारू वाहतूक प्रकरणी सदानंद दत्तात्रय यादव (रा. घोटी, ता. माढा), सज्जन आदिनाथ थोरात (रा. हिवरे, ता. मोहोळ) या संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

याबाबतची माहिती अशी, की हिवरे (ता. माढा) येथून मेडसिंगीकडे (ता. सांगोला) जाणाऱ्या एका टेम्पोमधून (एमएच 45 टी-3869) अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री पोलिसांनी मुंढेवाडी परिसरात सापळा रचला. दरम्यान, एक संशयित टेम्पो भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून आले. या वेळी पोलिसांनी पाठलाग करून टेम्पो अडवला. चालकाकडे विचारणा केली असता, मेडसिंगीला कडबा घेऊन निघाल्याचे त्याने सांगितले. परंतु, पोलिसांना संशय आल्याने टेम्पोची तपासणी केली असता, कडब्याच्या पेंड्यांमध्ये गोवा बनावटीच्या 30 बॉक्‍समध्ये एक हजार 440 अवैध दारूच्या बाटल्या लपवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी अवैध दारूसाठ्यासह टेम्पो जप्त केला. 

ही कारवाई तालुका पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शानाखाली एपीआय आदिनाथ थोरात, पोलिस कॉन्स्टेबल सुधीर शिंदे, सोमनाथ नरळे यांनी केली. संशयित आरोपींना आज न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur taluka police confiscated stocks of illegal liquor