पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर उघडण्याची शक्‍यता कमीच, कारण...

भारत नागणे 
रविवार, 31 मे 2020

काही दिवस मंदिर बंद ठेवावे लागेल 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मार्चपासून विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. केंद्र सरकारने 8 जूनपासून मंदिर दर्शनासाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी राज्य सरकार या बाबत कोणता निर्णय घेणार यावरच सर्व काही अवलंबून आहे. आषाढी पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर आणखी काही दिवस बंद ठेवावे लागेल, अशीच परिस्थिती आहे. 
- सुनील जोशी, कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समिती, पंढरपूर 

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडीच महिन्यानंतर आठ जूननंतर पहिल्या टप्प्यात देशभरातील धार्मिक स्थळे आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. असे असले तरी पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर दर्शनासाठी उघडण्याची शक्‍यता सध्यातरी कमीच आहे. आगामी आषाढी पायी पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर पुन्हा भाविकांसाठी कधी खुले होणार याकडेच राज्यभरातील विठ्ठल भक्तांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे इतक्‍यात विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाईल, याची शक्‍यता कमीच आहे. 
केंद्र सरकारने लॉकडाउनचा 30 जून पर्यंतचा पाचवा टप्पा जाहीर केला आहे. यामध्ये अनेक गोष्टी शिथील केल्या आहेत. यामध्ये रेड झोन आणि कंन्टेनमेंट झोन सोडून अन्य भागातील सर्व धार्मिक स्थळे आणि मंदिरे 8 जूननंतर सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी महाराष्ट्रातील कोरोना बाधीत रूग्णांची वाढती संख्या पाहाता, राज्य सरकार विठ्ठल मंदिर खुले करण्यास परवानगी देईल का, या विषयी ही साशंकता आहे. 

74 दिवसांपासून विठ्ठल मंदिर बंद ! 
देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्या नंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने पंढरपुरातील विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर प्रथमच भाविकांना दर्शनासाठी बंद केले. यामध्ये चैत्री यात्रा, गुढी पाडवा, अक्षय तृतीया, रामनवमी यासह महिन्याची एकादशी, असे अनेक उत्सव रद्द करून साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले. सुमारे अडीच महिन्याच्या प्रदिर्घ कालावधी नंतर विठू भक्तांना आता देवाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. 

पावणेचार कोटींचे उत्पन्न बुडाले 
गरीब भक्तांचा देव अशी विठ्ठलाची ओळख असली तरी अलीकडच्या काळात विठ्ठल मंदिर समितीच्या उत्पन्नात भरीव अशी वाढ झाली आहे. सरासरी दिवसाला मंदिर समितीला सर्व मिळून सुमारे पाच लाख रूपयांचे उत्पन्न मिळते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 74 दिवसांपासून मंदिर दर्शनासाठी बंद आहे. बंद काळात विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे सुमारे पावणे चार कोटी रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpurs Vitthal temple is unlikely to open because