"पांडुरंग' देणार गेल्या हंगामातील प्रतिटन उसाला 206 रुपयांचा हप्ता : आमदार प्रशांत परिचारक 

मनोज गायकवाड 
Friday, 9 October 2020

श्री पांडुरंग कारखान्याने गेल्या हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिटन 206 रुपयांचा हप्ता देण्यात येणार असून, येत्या दोन दिवसांत त्याचे वाटप सुरू होईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. चालू हंगामासाठी पार पडलेल्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभाच्या निमित्ताने ते बोलत होते. 

श्रीपूर (सोलापूर) : श्री पांडुरंग कारखान्याने गेल्या हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिटन 206 रुपयांचा हप्ता देण्यात येणार असून, येत्या दोन दिवसांत त्याचे वाटप सुरू होईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. चालू हंगामासाठी पार पडलेल्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभाच्या निमित्ताने ते बोलत होते. 

पांडुरंग परिवाराचे श्रद्धास्थान असलेल्या (कै.) सुधाकरपंत परिचारक यांच्या बारा ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या हस्ते अग्नी प्रज्वलित करून कारखान्याचा बॉयलर प्रज्वलित करण्यात आला. या निमित्ताने कारखान्याचे संचालक परमेश्वर गणगे यांनी सपत्नीक सत्यनारायण महापूजा केली. आमदार परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला "पांडुरंग'चे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, माजी अध्यक्ष दिनकरराव मोरे, संचालक मडळातील आजी - माजी सदस्य, प्रणव परिचारक, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. 

यांच्या हस्ते झाले बॉयलर प्रदीपन 
दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांचे ज्येष्ठ सहकारी व कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद असलेल्या ज्ञानोबा राजाराम शिंदे, अनंत दिगांबर राजोपाध्ये (रांझणी), लक्ष्मण सोपान डुबल (अजनसोंड), वसंत बाबूराव चव्हाण, ज्योतिराम रामचंद्र चव्हाण (बाभूळगाव), शिवाजी दत्तात्रय देशमुख (कासेगाव), दादा नारायण यलमार (सुपली), धोंडीबा घनश्‍याम पाटील (आव्हे), संदीपान भीमराव वाडेकर (शिरगाव), श्‍यामराव सखाराम लोखंडे (भंडीशेगाव), सीताराम ज्ञानोबा बागल (गादेगाव), आबासाहेब जयवंत गायकवाड (चिं. भोसे) यांच्या हस्ते बॉयलर प्रज्वलित करून पांडुरंग परिवाराने सुधाकरपंतांच्या सहकाऱ्यांचा सन्मान उंचावत त्यांच्याप्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandurang Sugar Factory will pay Rs 206 per tonne of sugarcane last season