
प्रतिवर्षी रथातून सवाद्य मिरवणूक काढत पांडुरंगाच्या पादुका मंदिरात आणल्या जातात. पण यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे रथातून प्रत्यक्ष मिरवणूक न काढता मंदिर समितीच्या स्कॉर्पिओ गाडीतून पांडुरंगाच्या पादुका विठ्ठल मंदिरात आणल्या गेल्या.
पंढरपूर (सोलापूर) : विठुरायाची शोभायात्रा चक्क स्कॉर्पिओ गाडीतून काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या गाडीतून देवाच्या पादुकांची प्रथमच अशी मिरवणूक काढण्यात आली. देवाच्या पादुकांची मिरवणूक ही रथातून किंवा पालखीमधून निघत असते. परंतु यावर्षी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा देवाच्या पादुकांना गाडीतून मंदिरात नेण्यात आल्या. मार्गशीर्ष महिन्यात साक्षात विठुरायाचे वास्तव्य विष्णुपद मंदिरात असते. तशी आख्यायिका आहे. या दरम्यान भाविक दर्शनासाठी विष्णुपद मंदिरात जातात. मंदिरातील देवाच्या पादुका विष्णुपद मंदिरात दर्शनासाठी ठेवल्या जातात.
बुधवारी (ता. 13) मार्गशीर्ष महिन्याच्या समाप्तीनंतर रात्री विष्णुपदावरील पांडुरंगाचे वास्तव्य संपुष्टात आले. त्यानंतर पांडुरंगाच्या पादुका विठ्ठल मंदिरात आणण्याची परंपरा आहे. प्रतिवर्षी रथातून सवाद्य मिरवणूक काढत पांडुरंगाच्या पादुका मंदिरात आणल्या जातात. पण यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे रथातून प्रत्यक्ष मिरवणूक न काढता मंदिर समितीच्या स्कॉर्पिओ गाडीतून पांडुरंगाच्या पादुका विठ्ठल मंदिरात आणल्या गेल्या. समितीच्या वतीने संपूर्ण गाडी विविध फुलांनी सजविण्यात आली होती.
कोरोनामुळे जरीपटके, अबदागिरी, रथ, पालखी असा कुठलाही शाही लवाजमा गेल्या वर्षभरापासून कुठल्याही देवस्थानातील देवास वापरता आला नाही. आषाढी यात्रेमध्ये तर सर्व संतांच्या पादुका एसटी बसने सामान्य भाविकांप्रमाणे पंढरपुरास आल्या होत्या. तर पंढरपूरहून पांडुरंगाच्या पादुका आळंदीला देखील एसटी बसने पोचल्या. यानंतर तर आता चक्क पांडुरंगच एसटी प्रवास सोडून आलिशान अशा स्कॉर्पिओ गाडीमधून मंदिरामध्ये आपल्या मूळ स्थानी येऊन पोचले आहेत. या वेळी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून देवाचे स्वागत केले. तसेच जमलेल्या भाविकांनी देवाचे दर्शन घेतल्यावर पादुका पुन्हा मंदिरात नेण्यात आल्या.
संपादन : श्रीनिवास दुध्याल