पापड व्यवसायातून मुलांना पदव्युत्तर शिक्षण देणारी पापरीची दुर्गा 

राजकुमार शहा 
Monday, 19 October 2020

चांगल्या वस्तू देण्याचा मानस 
आजपर्यंत पापड तयार केले आहेत. परंतु, ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांकडून शेवया, वेफर्स आदी वस्तूंची मागणी वाढत आहे. त्या चांगल्या प्रतीच्या तयार करून ग्राहकांना देण्याचा मानस आहे. 
राजश्री जाडकर, नव उद्योजिका. 

मोहोळ (सोलापूर) : ग्रामीण भागात कुठलाही व्यवसाय करणे तसे अवघडच. एक तर व्यवसायाला पोषक वातावरण नसते. त्यामुळे उत्पादीत मालाच्या विक्रीसाठी मोठी कसरत करावी लागते. मात्र, यातूनही मार्ग काढून पापरी (ता. मोहोळ) येथील राजश्री हनुमंत जाडकर या महिलेने पापड व्यवसाय सुरू करून प्रपंच पाहत मुलांच्या पदव्युत्तर शिक्षणाला हातभार लावला आहे. 

मुळच्या नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील राहिवाशी परंतु सून म्हणुन त्या पापरी येथे आल्या. राजश्री जाडकर यांनी गेल्या चार वर्षापासून पापड तयार करून तो विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. सध्या सर्व स्तरातील नागरिकांना तयार वस्तू पाहिजे, कुणाकडेही वेळ नाही. चार लाख रुपयांची आर्थिक गुंतवणूक करून जाडकर यांनी पापड तयार करण्याचे यंत्र, लहान पिठाची चक्की, पीठ मळणी यंत्र खरेदी केले आहे. तांदूळ व उडदाचे पापड तयार करतात. दररोज सुमारे 35 ते 40 किलो पापड तयार होतो. सिद्धी पापड या नावाने व्यवसाय करतात. उत्पादीत माल पंढरपूर, अकलूज, मुंबई, पुणे, बोरगाव, याठिकाणी विकला जातो. या व्यवसायात पती हनुमंत, मुलगा विशाल यांच्यासह तिघांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 
चांगल्या दर्जाचे पापड तयार होत असल्याने अनेक ग्राहक साहित्य देऊनही पापड तयार करून घेऊन जातात, त्यात मजुरी मिळते. पापडासाठी लागणारा पापड मसाला यासह अन्य कच्चामाल चांगल्या प्रतीचा वापरल्याने पापडाची चव उत्तम आहे. जाडकर यांचे नातेवाईक केरळ या ठिकाणी असल्याने ते आल्यावर मोठ्या प्रमाणात पापड विक्रीसाठी घेऊन जातात. त्यामुळे त्या भागातील ही मागणी आहे. परंतु व्यवसाय लहान असल्याने तिकडे पाठविणे परवडत नसल्याचे जाडकर यांनी सांगितले. या व्यवसायावर संपूर्ण शेतीचाही खर्च भागवला जातो. वरचेवर व्यवसाय वृद्धींगत होत असल्याचे जाडकर यांनी सांगितले. 

संपादन ः संतोष सिरसट 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Papari's Durga, which provides post-graduate education to children through papad business