मराठा आरक्षणात संसदेने करावा हस्तक्षेप, सोलापूरसकल मराठा समाजाची मागणी

प्रमोद बोडके
Friday, 18 September 2020

मराठा समाजाची अस्वस्थता न परवडणारी 
अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळाला होता. मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केल्याने मराठा समाजातील तरुण सध्या अस्वस्थ आहेत. मराठा समाजाची ही अस्वस्थता कोणत्याही सरकारला परवडणारी नाही. सरकारने यामध्ये तात्काळ तोडगा काढावा अशी अपेक्षा शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी व्यक्त केली. 

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या अनेक निर्णयांमध्ये संसदेने हस्तक्षेप केल्याच्या घटना घडल्या आहेत. आरक्षण दिल्यानंतर स्थगिती मिळविण्याची घटना महाराष्ट्रात फक्त मराठा समाजासोबतच घडली आहे. मराठा समाजाची भावना विचारात घेऊन संसदेने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज व्यक्त केली. 

मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा समाजाचा आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्यावतीने 21 सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी आज छत्रपती शिवाजी प्रशालेत झालेल्या पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

यावेळी माऊली पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर, माजी महापौर मनोहर सपाटे, नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेवक विनोद भोसले, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राजन जाधव, गणेश डोंगरे, माजी उपमहापौर नानासाहेब काळे, शाम कदम, श्रीकांत डांगे यांच्यासह सर्वपक्षीय मराठा नेते उपस्थित होते. 

माऊली पवार म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय प्रलंबित असताना राज्य सरकारने काढलेली पोलीस भरती ही चुकीची आहे. मराठा समाजातील जास्तीत जास्त करून सैन्य व पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतात. या समाजाला डावलून सरकार भरती करत आहे. समाजातील तरुणावर अन्याय करणारा हा निर्णय आहे. महाराष्ट्रात मराठा साजाला आरक्षण दिल्यामुळे केंद्र सरकारच्या आर्थिक दुर्बल आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील तरुणांना घेता येत नाही. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. अशा दुहेरी संकटात राज्यातील मराठा समाजातील तरूण सापडला आहे. सोलापूर जिल्हा बंद मध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, सराफ बाजार यासह सर्वपक्षीय नेत्यांनी, व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही माऊली पवार यांनी दिली. 

आमदारा, खासदारांच्या घरासमोर आंदोलन 
सोलापूर शहर व जिल्ह्यातील आमदार खासदारांच्या घरासमोर मराठा समाजाच्यावतीने सोमवारी हलगी नाद व आसूड ओढो आंदोलन करण्यात येणार आहे. संसदेत खासदारांनी मराठा आरक्षणाचा विषय मांडावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parliament should intervene in Maratha reservation, demand of Solapur Sakal Maratha community