तेलगावच्या पाटील गुरुजींनी पालकांच्या प्रतिसादामुळे गुगलमिटद्वारे घेतला विद्यार्थ्यांचा अभ्यास

संतोष सिरसट 
Tuesday, 8 September 2020

सर्व विषयांच्या बनविल्या टेस्ट
ऑनलाईन शिक्षणाचाच भाग म्हणून त्यांनी गुगल फॉर्मवरून इयत्ता सातवीच्या सर्व विषयाच्या टेस्ट बनविल्या आहेत. आज धडा शिकवून झाला की लगेच त्याचे मूल्यमापन ते करतात. मूल्यमापनासाठी त्यांनी बनविलेल्या टेस्टच्या लिंक टाकून ते मुलांकडून प्रतिसाद जाणून घेतात. अशाप्रकारे दररोज संध्याकाळी सात ते नऊ यादरम्यान त्यांची ऑनलाइन तासिका चालू असते. ऑनलाइन तासिकेमुळे सध्या मुले व पालक आनंदी आहेत. पालकांनाही ऑनलाईन शिक्षणाचा अर्थ कळू लागला आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्येही ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया रुजत आहे असेच म्हणावे लागेल.

सोलापूर ः उत्तर सोलापूर तालुक्‍याच्या टोकाला असलेले व सीना नदीकाठी वसलेले गाव ज्याचे नाव आहे तेलगाव. गाव जरी लहान असले तरी त्याठिकाणच्या पालकांमध्ये आपल्या मुलांना शिकविण्याची जिद्द मोठी. गाव नदीकाठी असल्याने बागायती क्षेत्र जास्त. त्यामुळे कोरोनाच्या काळात मुलांच्या शिक्षणासाठी ऍन्ड्रॉईड मोबाईल देण्यासाठी त्याठिकाणचे पालक झाले तयार. नेमकी हीच गोष्ट विकास पाटील नावाच्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाच्या पथ्यावर पडली. पालकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून पाटील यांनी विद्यार्थ्यांना गुगलमीटद्वारे शिक्षण देण्यास सुरवात केली.

गेल्या 15 मार्चपासून सर्व शिक्षण संस्था बंद आहेत. शहरी भागातील मुले थोडीफार शैक्षणिक प्रवाहात टिकून आहेत. या ऑनलाईन शिक्षणात ग्रामीण भागातील मुलांची मोठी अडचण झाली आहे. या अडचणींवर श्री. पाटील यांच्यासारख्या काही होतकरु शिक्षकांनी मार्ग काढला आहे हे विशेष. पाटील यांना सातवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करायचे कसे याची चिंता सतावत होती. त्यावर त्यांनी मार्ग काढायचा ठरवला. मुलांना गुगल मीटच्या मदतीने अध्यापन करता येईल का? याचा विचार त्यांनी केला. त्यासाठी वर्गातील कोणत्या पालकाकडे मोबाईल आहे, त्याचा अभ्यास करून त्यांनी ऑनलाईन शिक्षण देण्याचे ठरविले. अँड्रॉइड मोबाईल असलेल्या मुलांना गुगल मीटच्या मदतीने अध्यापन करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला प्रतिसाद कमी होता. नंतर वर्गातील 80 टक्के मुले या अभ्यासास प्रतिसाद देऊ लागली. पाटील गुरुजींनी गुगल मीटचा वापर करून मुलांना यू ट्युबचे अनेक व्हिडीओ दाखवून गणितासारख्या अवघड संकल्पना सोप्या करून दाखवल्या आहेत. वर्गातील सर्व मुले टप्प्याटप्प्याने शिकू लागली आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patil Guruji from Telgaon took the students' study through Googlemit due to the response of the parents