पॅटर्न माढा पोलिसांचा ! दोन संवेदनशीलसह सहा ग्रामपंचायती केल्या बिनविरोध 

Amul Kadbane
Amul Kadbane

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत असते. पोलिस व जनता यामध्ये सुसंवाद असल्यास दैनंदिन समाजातील अशक्‍य असे काहीच कामे राहात नाहीत. याचा प्रत्यय माढा पोलिस ठाणे येथे येतो. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात माढा पोलिस ठाणे पॅटर्न चर्चेत आला आहे. कार्यक्षेत्रात असलेल्या 32 गावांपैकी सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका पूर्णपणे बिनविरोध झाल्या असून, इतर चार ग्रामपंचायतींमध्ये काही जागा बिनविरोध करण्यासाठी यश आले आहे. यामध्ये दोन राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गावांचाही समावेश आहे 

नुकत्याच राज्यातील पंचवार्षिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततामय वातावरणात पार पडल्या. यामध्ये महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गावातील वाद-विवाद व तंटे मिटावेत तसेच गावात सुखसमृद्धी नांदावी, गावचा विकास व्हावा या उद्देशाने अनेक नेतेमंडळींनी व प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करा, असे आवाहन केले होते. हा धागा पकडत माढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमूल कादबाने व पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, पोलिस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली माढा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींस भेट देऊन स्थानिक नेतेमंडळी व गावकऱ्यांशी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी चर्चा- विनिमय बैठका घेतल्या. याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने असो अथवा वैयक्तिक वाद - विवाद व तंटे त्यांनी या बैठकीच्या माध्यमातूनच निराकरण केले. नागरिकांनी देखील पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दर्शवत ग्रामपंचायत बिनविरोधसाठी पाठिंबा दर्शवला. त्यामुळे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सापटणे (भोसे) व जामगाव या ग्रामपंचायतीबरोबर धानोरे, वडाचीवाडी (त.म) महातपूर, खैराव या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. 

त्याचबरोबर वडाचीवाडी (उ. बु.), लोंढेवाडी, वेताळवाडी, अंजनगाव (उ) या गावांतही बिनविरोधसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. परंतु या गावांमध्ये काही मोजक्‍या जागांवर निवडणुका झाल्या आहेत. माढा पोलिसांच्या आवाहनाला कार्यक्षेत्रातील नुकत्याच झालेल्या 32 ग्रामपंचायतींपैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध तर इतर चार ग्रामपंचायतींमध्येही काही जागा बिनविरोध करण्यासाठी यश मिळाले आहे. तसेच या भागातील सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततामय वातावरणात झालेल्या असल्याने व एकाच पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने, माढा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वी या पोलिस ठाण्याच्या वतीने डॉल्बीमुक्त मिरवणुका पॅटर्न राबविण्यात आला होता. ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी स्थानिक नेतेमंडळी, पोलिस पाटील व माढा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. 

माढा पोलिसांनी केलेल्या आवाहनाला तसेच गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना व गावकऱ्यांना शुभेच्छा. भविष्यात गावच्या विकासासाठी पोलिसांच्या वतीने सहकार्य राहील. 
- अतुल झेंडे, 
अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण 

गावातील तंटे मिटावेत या हेतूने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, बऱ्याच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे या गावांतील पुढील पाच वर्षात चांगली विकासाची कामे होऊन वाद- विवाद कमी होतील अशी अपेक्षा आहे. 
- अमूल कादबाने, 
सहाय्यक पोलिस निरीक्षक, माढा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com