सोलापूरकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी हे लक्षात ठेवा ! यात्रा काळात 'या' भागात फिरणाऱ्यांवर पोलिस करणार कारवाई

तात्या लांडगे
Monday, 11 January 2021

शहरातील या परिसरात असेल संचारबंदी 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक), मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट कॉर्नर, हरिभाई देवकरण प्रशालेसमोरील रस्ता, स्ट्रीट रोड, सिध्देश्‍वर कन्या प्रशालेसमोरील रस्ता, वनश्री नर्सरी, विष्णू घाट, गणपती घाट, सरस्वती कन्या प्रशाला, भुईकोट किल्ल्याच्या आतील परिसर, चार पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, या परिसरात संचारबंदी लागू असतील, असे पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी आपल्या आदेशात आज स्पष्ट केले. 

सोलापूर : कोरोनामुळे यंदा ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांची यात्रा साधेपणानेच साजरी केली जाणार आहे. 12 ते 16 जानेवारीपर्यंत यात्रा चालणार आहे. यात्रेच्या निमित्ताने गर्दी होऊ नये म्हणून पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी आज मंदिर परिसरात संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. या परिसरात विनापरवाना येणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

 

शहरातील या परिसरात असेल संचारबंदी 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक), मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट कॉर्नर, हरिभाई देवकरण प्रशालेसमोरील रस्ता, स्ट्रीट रोड, सिध्देश्‍वर कन्या प्रशालेसमोरील रस्ता, वनश्री नर्सरी, विष्णू घाट, गणपती घाट, सरस्वती कन्या प्रशाला, भुईकोट किल्ल्याच्या आतील परिसर, चार पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, या परिसरात संचारबंदी लागू असतील, असे पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी आपल्या आदेशात आज स्पष्ट केले. 

 

नंदीध्वज मिरवणूक काढली जाणार नसल्याने थेट संमती कट्टा याठिकाणी नंदीध्वजांची सजावट केली जाणार आहे. धार्मिक विधीसाठी 50 मानकऱ्यांनाच परवानगी देण्यात आली असून त्यांच्याकडे पोलिसांचे पास असावेत, असे बंधनकारक करण्यात आले आहे. मंदिर परिसरात आज (सोमवारी) रात्री 12 वाजल्यापासून संचारबंदीचे आदेश लागू होणार आहेत. 17 जानेवारीपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. कोरोनाचा धोका अद्याप टळला नसून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे. यात्रा काळात शहरात गर्दी होऊ नये म्हणून सात पोलिस ठाण्याअंतर्गत ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त असणार आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

 

आदेशातील ठळक बाबी... 

  • संचारबंदी लागू असलेल्या परिसरातील रहिवाशांनी घ्यावे संबंधित पोलिस ठाण्यांकडून पास 
  • शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ओळखपत्र असणार बंधनकारक; अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांना परवानगी 
  • श्री सिध्दरामेश्‍वर मंदिरात दर्शन आणि यात्रेच्या निमित्ताने कोणालाही दिला जाणार नाही प्रवेश 
  • होम मैदानावर मॉर्निंग वॉक, मैदानी खेळ, सराव, सेल्फी पॉईंटसाठी असणार 17 जानेवारीपर्यंत बंदी 
  • धार्मिक विधीसाठी साहित्यांची ने- आण करणाऱ्या वाहनांसाठी परवानगी; पास बंधनकारक 
  • मंदिर परिसरात मनोरंजन, करमणुकीचे, खाद्यपदार्थ, पुजा साहित्य विक्रीस परवानगी नाही; दुकानदारांना प्रवेशबंदी 
  • संचारबंदीमुळे सोलापूर जिल्हा व जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील भाविकांना नाही प्रवेश 
  • नंदीध्वज मिरवणूक, पालखी मिरवणूक, वाद्य पथकास संचारबंदी काळात मनाई; फटाक्‍यांची आतिषबाजी अन्‌ शोभेचे दारुकाम नाहीच 
  • मंदिरातील दैनंदिन पुजाअर्चा, धार्मिक विधीसाठी पुजाऱ्यांना मर्यादित प्रवेश; पोलिस ठाण्यांकडील पास बंधनकारक 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: persons off Solapur, remember this! Police will take action against those walking in this area during the yatra