पेट्रोल भडकतेय ! सोलापूर शहरात पेट्रोल 91 रुपये लिटर; सर्वसामान्यांच्या खिशावर वाढला भार

Petrol
Petrol

सोलापूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. त्याप्रमाणे गेल्या आठवडाभरापासून पेट्रोल व डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सोलापूर शहरात शुक्रवारी पेट्रोल प्रतिलिटर 91.24 पैसे तर डिझेलचे दर प्रतिलिटर 79.76 पैसे झाले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना महामारीमुळे लॉकडाउन असल्याने उद्योग- व्यवसाय बंद होते, त्यामुळे सर्वजण घरी होते. मात्र, अनलॉकच्या टप्प्यात सर्व व्यवसाय- उद्योगधंदे सुरू झाले आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने व्यवसाय सुरू झाले आहेत. पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक भरडून निघाला असून, सामान्यांच्या खिशाचा भार वाढला आहे. 

सोलापूर शहर- जिल्ह्यात विशेषकरून कामगार व कर्मचारी आज मोठ्या प्रमाणावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर करत आहेत. पेट्रोलप्रमाणेच डिझेलचे दरही सातत्याने वाढत आहेत. शहरात आणि शहराबाहेरील पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचे दर जवळपास सारखेच असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. लॉकडाउननंतर रस्त्यावरील वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याचा परिणाम हा पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर झाला आहे. पेट्रोल 91.21 पैसे प्रति लिटर मिळत आहे. डिझलचे दर देखील 79.81 पैसे प्रति लिटर एवढे झाले आहेत. 

मागील महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. सरकारने अनेक आश्‍वासने दिली; मात्र ती पूर्ण होताना दिसून येत नाहीत. आधीच कोरोना महामारीमुळे अनेकांच्या हाताचे काम गेले आहे, त्यात आणखी महागाई होत असल्याने सामान्यांना जगणे कठीण बनले आहे. 
- रोहित कांबळे, 
सम्राट चौक, सोलापूर 

कोरोना महामारीमुळे मागील वर्षी जवळपास आठ महिने रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ पूर्णत: थांबली होती. मात्र, अनलॉकच्या टप्प्यात हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येत आहे. मात्र, वाहन चालविताना विचार करावा लागत आहे. कारण, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. 
- रोहिणी चौधरी, 
जुळे सोलापूर 

लॉकडाउनमुळे आर्थिक चणचण भासत आहे. त्यात पेट्रोलचे दर वाढले. त्यामुळे सामान्य माणसाने आपला रोजगार आणि संसार सांभाळणे कठीण बनले आहे. 100 रुपये माझ्यासारख्या माणसाचे पेट्रोलवर खर्च होत आहेत. जर असेच पेट्रोलचे दर वाढत राहिले तर सामान्यांना दुचाकी चालवणे अवघड बनेल. 
- सचिन शिरसट, 
बुधवार पेठ 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील काही महिन्यांत दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या 
संख्येत वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर होत आहे. 
- प्रकाश हत्ती, 
पेट्रोल पंप असोसिएशन अध्यक्ष, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com