तत्वचिंतक जीवनभाष्यकार : सूर्यंकांतशास्त्री होनमुटे 

सतीश दुधाणे, करकंब
Wednesday, 16 September 2020

लोकेष्णा हरवून गेलेली उच्चतत्वज्ञानी व्यक्ती जेव्हा एकांती लोकांती तपभूता बनते. ज्ञानप्रसारार्थ जे जे वांच्छील त्यांच्यासाठी हयातभर मिळवलेले ज्ञानतत्वभांडार खुले करते. अशी व्यक्ती आजच्या युगात दुर्मीळच. गेली पाच तपे अखंडपणे इच्छुक साधक श्रोत्यांसाठी प्रवचने देणारे, तत्वसारांशाची चर्चा करणारे सूर्यकांत शास्त्री हे केवळ करकंबचेच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राचे झाकले तपोधन होते. म्हणूनच महाराष्ट्र राज्य शासनाने 2003 साली महाकवी कालिदास पुरस्कार देऊन सूर्यकांतशास्त्री यांना सन्मानपूर्वक गौरविले होते. सन1955 ते 1959 या चार वर्षांत सूर्यकांत शास्त्री यांन सोलापूरच्या वारद पाठशाळेतही संस्कृत अध्यापनाचे कार्य केले होते. त्यांना पितृपंधवाड्यानिमित्त भावांजली... 

स्मरण 
हरिभक्त परायण, सदाचारसंपन्न, मराठी संतसाहित्याचे अभ्यासक, भक्तिवेदांत पर ग्रंथ संपदेचे व्यासंगी, संस्कृतभाषाशास्त्री, काव्यतीर्थ शिक्षाशास्त्री अशा अनेक बौद्धिक पैलूंनी संपन्न असलेली व्यक्ती जेव्हा कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्ञानाचा प्रसार करते, तेव्हा त्या पदव्यातील व लोकनामाभिधानातील सार्थकता दिसून येते. लोकेष्णा हरवून गेलेली उच्चतत्वज्ञानी व्यक्ती जेव्हा एकांती लोकांती तपभूता बनते. ज्ञानप्रसारार्थ घरीच राहून जे जे येतील त्यांच्यासाठी हयातभर मिळवलेले ज्ञानतत्वभांडार खुले करते. अशी व्यक्ती आजच्या युगात दुर्मीळच म्हटले, तरी ते वाऊगे होणार नाही. गेली पाच तपे, साधारणत: साठ वर्षे अखंडपणे आपल्या शिष्यांसाठी व इच्छुक साधक श्रोत्यांसाठी प्रवचने देणारे, तत्वसारांशाची चर्चा करणारे सूर्यकांत शास्त्री हे केवळ करकंबचेच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राचे झाकले तपोधन होते. म्हणूनच महाराष्ट्र राज्य शासनाने साली महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता.. 
रोज रात्री 7 ते 9 या वेळेत त्यांच्या ज्ञानसमृद्ध प्रवचनांचा लाभ घेणारे अर्धशतकी शिष्य ही केवळ एकच त्यांच्या महानतेची कसोटी ठरत नाही. सहस्त्रावधी श्रोत्यांना घातलेली संस्कृत वाड़मयमोहिनी ही तर त्यांच्या तेजोमय जीवन चरित्राची विशेषतेने ओळख होती. असे महान तत्वचिंतक व द्रष्टे प्रवचनकार सूर्यकांतशास्री होनमुटे हे नुकतेच 8 सप्टेंबर रोजी वार्धक्‍यामुळे वयाच्या नव्वदाव्या वर्षी देवाघरी गेले. लॉकडाउनच्या काळात थांबलेला त्यांचा प्रवचनसेवेचा ज्ञानयज्ञ आता कायमचा थांबला. एक ज्ञानार्थी चिरनिद्रेच्या कुशीत शांत झाले.. 

सडसडीत बांध्याचे व करारी व्यक्तिमत्वाचे सर हे करकंबचे रहिवाशी. त्यांचा जन्म सन 1929 साली मातोश्री प्रयागबाई व पिता शंकर होनमुटे यांचे कुशीत झाला. जन्मजात परिस्थिती अत्यंत गरिबीची. वडिलांचा विणकामाचा पारंपारिक व्यवसाय. मराठी पाचवी पर्यंतचे शिक्षण गावीच झाले. कोवळ्या वयातच त्यांना तत्वचिंतक ग्रंथ वाचनाची आवड निर्माण झाली. त्यातूनच त्यांच्या मनावर संस्कृत भाषेचे महत्त्व ठसू लागले. संस्कृत भाषेचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी घर सोडले, कष्टही उपसले. 

सातारा जिल्ह्यातील वाई येथील प्राज्ञपाठ शाळेमध्ये त्यांना गुरुकुल पद्धतीतून प्रवेश मिळाला. आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या अनेक दिग्गज पंडितांच्या सानिध्यात यांनी संस्कृत शास्त्राध्ययन व वेदाध्ययन केले. सन 1950 ते 1955 पर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी संस्कृत भाषेतील "काव्यतीर्थ" ही पदवी प्राप्त केली.. 

सन 1955 ते 1959 या चार वर्षांत सरांनी सोलापूरच्या वारद पाठशाळेत संस्कृत अध्यापक म्हणून कार्य केले. शहरी विद्यार्थ्याना संस्कृत शिकविणारा एक ग्रामीणही माणूस असू शकतो, हेही वैशिष्ट्यपूर्णच म्हणावे लागेल. 

पुढे सन 1959 साली आपल्याच गावी करकंबच्या रामभाऊ जोशी प्रशालेत संस्कृत अध्यापकाची नोकरी मिळाल्याने त्यांनी सोलापूर शहर सोडले व करकंब ग्रामसेवेत ते रमून गेले. त्यानंतर सन 1960साली त्यांनी "शास्त्री' ही पदवी मिळवली. सन 1965-66मध्ये त्यांना केंद्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती येथील "शिक्षा शास्त्री' ही पदवी मिळाली. सन 1987 अखेरपर्यंत संस्कृत अध्यापकाची सेवा करून नियत वयोमानानुसार करकंब हायस्कूलमधून ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते संस्कृत भाषेच्या सेवेसाठी आणखीन कार्यप्रवृत्त झाले. पुढे 10 वर्षे वाई- सातारा येथील धर्मकोश कार्यालयात तत्वज्ञान संशोधनाचे कार्य त्यांनी केले. दरम्यानच्या काळात सरांनी अभ्यासयात्राही केल्या. चारीदिशा हेच चारीधाम मानून तीर्थयात्राही केल्या. 

सन 2003 मध्ये त्यांना कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या शानदार समारंभात महाराष्ट्र शासनातर्फे "महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले." सन 2004 मध्ये त्यांना इचलकरंजी येथील नागरिकांच्या वतीने "समाजभूषण' या पुरस्काराने गौरविले गेले. तसेच करकंब येथील फेस्टिवल ग्रुपने "करकंबभूषण' या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केले. 2018 साली सद्भावना सेवा दलातर्फे समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते त्यांना ज्ञानतपस्वी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांचा हा लौकीकपट तसा झाकल्या मूठीसारखाच राहिला, किंबहुना त्यांनाही तो तसाच ठेवायचा होता.. 

अवघाचि संसार सुखाचा करीत असताना आपल्या ज्ञान समृद्ध वाणीने अनेक प्रवचने लॉकडाउनच्या काळापर्यंत ते देत राहिले. बाहेरगावी प्रवचनार्थ गेले तरी प्रवासभाडेही संयोजकांकडून ते स्वीकारत नसत. हा त्यांच्या निर्मोही मनाचा चमत्कार होता. वयाच्या नव्वदीतही त्यांचे पाठांतर व स्मरणशक्ती पाहून श्रोते आणि शिष्यगण चकित होत असत. प्रवचनाच्या व्यासपीठावर ते आरुढ झाले की, श्रोते ज्ञानाच्या प्रवाहात भिजून चिंब व्हायचे. त्यात केवळ श्रोतेच नव्हे तर ते स्वतः ही रंगून जायचे. आपल्याच वाणीच्या वैभवातून आपण स्वत:ही आनंदून जायचे. "जड जीवांच्या कल्याणासाठी स्वतःच्या देहाचे मूल्य देऊन चंदनासारखे झिजण्यातच पुरूषार्थ आहे," ही त्यांची साधी सरळ शिकवण होती. त्यांच्या अंगी असलेली विद्वत्ता त्यांच्या शब्दाशब्दातून प्रगट व्हायची. त्यांच्या वाणीत तेज, ओज व सामर्थ्य होते. समाजातील अज्ञानी, सुशिक्षित, सज्जन, दुर्जनांवरही त्यांनी आपल्या अमोघ वाणीने व अभेदभावाने प्रबोधन करून कृतार्थतेचा मार्ग दाखविला. त्यांचा शिष्य म्हणून अनेक प्रवचने श्रवणाचा लाभ मिळाला, हे माझे थोर भाग्य होय... 

करकंब सारख्या अकरा संजीवन समाधीस्थळांच्या भक्तीगंधीत सानिध्यात त्यांना करकंबचे थोर संत गजानन बाप्पांचा काही काळ सहवास लाभला.. 

विद्ये करिता खूप परिश्रम घेतल्यावर, सुविद्य होऊनही इतरांनाही मार्गदर्शन करत विद्येची व संप्रदायाची अनेक वर्षे निस्पृहसेवा करणारी काही थोडीच माणसे असतात. गंगामाईसारखे निर्मळ, निष्कलंक, निस्पृह, पवित्र-पावन व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली... 

संपादन : अरविंद मोटे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Philosopher Biographer: Suryankantashastri Honmute