
मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द लमाणतांडा येथील श्री परमेश्वर आश्रमशाळेतील कलाशिक्षक सुरेश भागवत मलाव यांच्या चित्रांचा समावेश महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता नववीसाठीच्या चित्रकला व रंगकाम या कार्यपुस्तिकेत 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून केला आहे.
कोरवली (सोलापूर) : मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द लमाणतांडा येथील श्री परमेश्वर आश्रमशाळेतील कलाशिक्षक सुरेश भागवत मलाव यांच्या चित्रांचा समावेश महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता नववीसाठीच्या चित्रकला व रंगकाम या कार्यपुस्तिकेत 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून केला आहे. पाठ्यपुस्तक महामंडळाने दिलेल्या विविध घटकांवर विद्यार्थ्यांना सहजरीत्या समजतील अशा सहजपणे परंतु वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षकरीत्या चित्रे काढून दिल्याने कलाशिक्षक श्री. मलाव यांच्या चित्रांची निवड करण्यात आली आणि त्याचा नववीच्या पुस्तकात समावेश झाला असल्याचे सुरेश मलाव यांनी सांगितले.
मलाव यांनी 1992 मध्ये कला पदविका परीक्षा सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने पटकावली आहे. त्याच वर्षी लमाणतांडा येथील श्री परमेश्वर आश्रमशाळेत कलाशिक्षक म्हणून ते कार्यरत झाले. जवळपास 28 वर्षे कलाशिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. ते दरवर्षी आपल्या शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबवीत असतात. त्यांनी स्वतः प्रकाशित केलेले ग्रेड परीक्षा संकल्प चित्र या पुस्तकाची पाचवी आवृत्ती प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची पुस्तके पोचली आहेत.
जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी 2013 मध्ये गुणवंत कलाध्यापक म्हणून श्री. मलाव यांचा गौरव केला आहे. तसेच लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्कार, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळाचा राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक तसेच जिल्हास्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कारही त्यांना यापूर्वी मिळाले आहेत.
यापूर्वी त्यांनी बालभारती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळावर कला विषयाच्या हस्तपुस्तिकेसाठी समीक्षक म्हणून काम केले आहे. 2008 मध्ये इयत्ता आठवीसाठी बालभारतीमध्ये कला हस्त पुस्तिकेसाठी समीक्षणोत्तर संपादकीय म्हणून काम केले आहे. कलाशिक्षक मलाव हे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी दीपावलीनिमित्त विविध प्रकारचे आकाश कंदील तयार करायला शिकवतात. त्यांनी श्री परमेश्वर आश्रमशाळेतील भिंतींवर काढलेली विविध आशयाची वैशिष्ट्यपूर्ण चित्रे विद्यार्थी, पालक व कला रसिकांना आकर्षित करून घेतात.
मलाव यांच्या चित्रांचा पाठ्यपुस्तकात समावेश झाल्याने समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे, आश्रमशाळेचे अध्यक्ष चंद्रकांत देशमुख, मुख्याध्यापक जब्बार शेख, संचालक रामभाऊ दुधाळ, बाळासाहेब डुबे पाटील, प्रशांत पाटील, तायाप्पा पुजारी, ताजोद्दीन शेख व शिक्षक वृंद यांनी कौतुक केले आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल