पिंपरीच्या युवकांची जीवदया ! पाण्यात वाहून जाणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लांना दिले जीवदान 

शांतिलाल काशीद 
Tuesday, 20 October 2020

बार्शी तालुक्‍यात पिंपरी (सा), मळेगाव, हिंगणी, पिंपळगाव परिसरात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सोमवारी सायंकाळी चार वाजता झालेल्या मुसळधार पावसात रस्त्याच्या दुतर्फा नदीचे स्वरूप आले. पावसाच्या पाण्यात रस्त्याच्या कडेने वाहून जात असलेल्या तीन कुत्र्याच्या पिल्लांना पुलाखाली जाण्याअगोदरच पिंपरीच्या दोन युवकांनी सतर्कता दाखवत जीवदान दिले. 

मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात पिंपरी (सा), मळेगाव, हिंगणी, पिंपळगाव परिसरात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सोमवारी सायंकाळी चार वाजता झालेल्या मुसळधार पावसात रस्त्याच्या दुतर्फा नदीचे स्वरूप आले. पावसाच्या पाण्यात रस्त्याच्या कडेने वाहून जात असलेल्या तीन कुत्र्याच्या पिल्लांना पुलाखाली जाण्याअगोदरच पिंपरीच्या दोन युवकांनी सतर्कता दाखवत जीवदान दिले. 

पिंपरी (सा) येथील युवक ग्रामपंचायत कर्मचारी विक्रम खांडेकर व ड्रायव्हर अक्षय सरवळे हे पिंपरी-हिंगणी रोडवरून जात असताना कुत्र्याच्या पिल्लांच्या ओरडण्याचा आवाज कानी पडला. समोर पाहिलं तर पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असलेल्या तीन पिल्लांची स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू होती. क्षणाचाही विलंब न लावता तिन्ही पिल्लांना वाहत्या पाण्यातून काढत जीवदान दिले. तत्काळ रस्त्यावर कोरड्या जागेत आणून त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवत आधार दिला. 

भोगावती, नागझरी, नीलकंठा नदीच्या महापुरात अनेक माणसे दगावली, कित्येकांचे प्राण वाचले, अनेक जनावरे वाहून गेली, अनेकांचे संसार उघडे पडले. या वेळी समाजातून अनेक मदतीचे हात पुढे आले. अशातच युवकांनी वेळीच सतर्कता दाखवून कुत्र्याच्या पिल्लांना दिलेले जीवदान खरच कौतुकास्पद आहे. पावसाने आणि थंडीने कुडकुडणाऱ्या पिल्लांना खाऊ व आश्रय देऊन माणुसकीचा व मायेचा पाझर आणखीन जिवंत असल्याचे दाखवून दिले. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल व दाखविलेल्या माणुसकीबद्दल पिंपरी (सा) ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले. 

पिंपरी (सा), हिंगणी परिसरात पावसाने कहर केल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. सोमवारी सायंकाळी पिंपरी (सा) येथे झालेल्या मुसळधार पावसात पशुवैद्यकीय दवाखान्याशेजारी रस्त्याच्या कडेला पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना तीन कुत्र्याच्या पिल्लांची जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू होती. मी व माझा मित्र अक्षय सरवळे दोघांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांचे प्राण वाचवले. त्यांना खाऊ दिला व जगण्यासाठी आश्रयही दिला. परिस्थिती खूप भयानक आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, मुक्‍या जनावरांना व माणसांना माणुसकीच्या जाणीवेतून आधार व धीर देणे गरजेचे आहे. 
- विक्रम खांडेकर, ग्रामपंचायत कर्मचारी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri youths give life to puppies who carrying in water