सोलापूरच्या कला वैभवात पडणार भर ! मराठी भवनचा तयार झाला आराखडा 

श्‍याम जोशी 
Wednesday, 2 December 2020

मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा तसेच याबाबतचे विविध उपक्रम एकाच ठिकाणी व्हावेत यासाठी सोलापूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या मराठी भवनचा अंतिम आराखडा मंगळवारी (ता. 1) झालेल्या बैठकीत तयार झाला. 

सोलापूर : मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा तसेच याबाबतचे विविध उपक्रम एकाच ठिकाणी व्हावेत यासाठी सोलापूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या मराठी भवनचा अंतिम आराखडा मंगळवारी (ता. 1) झालेल्या बैठकीत तयार झाला. 

सोलापूरमध्ये मराठी भवन व्हावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दक्षिण सोलापूर शाखेने आमदार प्रणिती शिंदे यांना निवेदन देऊन हा विषय लावून धरला होता. त्यानंतर आमदार शिंदे यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून मराठी भवनसाठी निधी मंजूर करून आणला. त्यानंतर तातडीने शहरातील कलावंत, चित्रकार, मराठी साहित्यिक, कवी अशा नामवंतांची बैठक घेऊन मराठी भवन उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले. मराठी भवनची इमारत कशी असावी, त्यामध्ये काय काय सुविधा असाव्यात यासाठी सूचना घेतल्या आणि दिल्या. त्यानुसार अंतिम स्वरूपात आलेल्या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. 

या वेळी आर्किटेक्‍ट अमोल चाफळकर, शाशिकांत चिंचोळी यांनी तयार करून आणलेले आराखडे मांडले गेले. त्यावर सविस्तर चर्चा झाली आणि काही बदल करून त्याला अंतिम स्वरूप देण्याचा निर्णय झाला. मराठी भवन आणि शुभराय आर्ट गॅलरीचा आराखडा अंतिम स्वरूपात तयार करण्यात आला. मुळे हॉस्पिटल शेजारच्या शुभराय कला दालनाच्या जागेत मराठी भवनची अद्ययावत तसेच वैविध्यपूर्ण इमारत उभारण्यात येणार असून त्यामध्ये शुभराय आर्ट गॅलरी नव्याने होणार आहे. तसेच या इमारतीमध्ये मराठी भाषेसंबंधी विविध विभाग, कला दालनाचे विविध विभाग, कला प्रदर्शन दालन, सेमिनार हॉल, प्रशस्त पार्किंग अशा सर्व सोईसुविधांचा समावेश असणार आहे. नैसर्गिक साधनसामग्री तसेच सूर्यप्रकाश, हवा याचा या इमारतीमध्ये पुरेपूर वापर होईल अशा पद्धतीने या मराठी भवनची रचना करण्यात येणार आहे. त्या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. या मराठी भवनच्या इमारतीचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

बैठकीला हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे, प्रशांत बडवे, चित्रकार पुष्कराज गोरंटला, डोंगरी, शशिकांत धोत्रे, देवेंद्र निंबर्गीकर, धनंजय टाकळीकर, दया पटणे, शिल्पकार धर्मराज रामपुरे, राजन रिसबुड, पराग शहा, जितेंद्र राठी, नगरसेवक विनोद भोसले, प्रदीप पिंपरकर, पत्रकार विनायक होटकर आदींसह चित्रकार, कलावंत उपस्थित होते. 

उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ निर्माण व्हावे : आमदार प्रणिती शिंदे 
मराठी भाषेची वृद्धी व्हावी आणि सोलापूरमधील उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी मराठी भवन आणि कला दालन तयार करण्यात येणार आहे. मराठी भवनमध्ये कलावंत चित्रकारांसाठी सर्व सोयी सहज उपलब्ध होतील आणि एक कला कौशल्याने सजलेली इमारत भावी पिढीला पाहण्यास मिळेल अशीच रचना या इमारतीमध्ये करण्यात येणार असून, सोलापूरच्या वैभवात मराठी भवनच्या इमारतीने भर पडणार असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The plan of Marathi Bhavan in Solapur was prepared