"इन्स्पायर' ! वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धन, पर्यावरणविषयक कृतिशील कार्य पोचवलेय हजारो लोकांपर्यंत 

किरण चव्हाण 
Tuesday, 22 September 2020

इन्स्पायर फाउंडेशनच्या सदस्यांनी केवळ झाडे लावून वृक्षारोपणाची चळवळ केली नाही तर आपण लावलेली झाडे टिकावीत यासाठी ज्या परिसरामध्ये व ज्या गावांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम असतो त्या गावांमध्ये वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरणविषयक शास्त्रीय पद्धतीने माहिती सांगितली जाते. सध्या पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, पर्यावरण संवर्धनासाठी करावयाच्या उपाययोजना, पर्यावरणपूरक सवयी याविषयीची समग्र माहिती एलसीडी प्रोजेक्‍टरद्वारे इन्स्पायर फाउंडेशनच्या स्वयंसेवकांकडून दिली जाते. 

माढा (सोलापूर) : माढ्यातील इन्स्पायर फाउंडेशनने मागील तीन वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील तीसहून अधिक गावांत व हिंगोली जिल्ह्यातही वृक्षारोपण व लोकांच्या मनामध्ये पर्यावरणपूरक सवयी व विचार रुजविण्याचे काम केले. आतापर्यंत सुमारे पाच हजार झाडे लावली आहेत. 

माढ्यातील इन्स्पायर फाउंडेशनने वृक्षारोपण तसेच विद्यार्थी व लोकांच्या मनांमध्ये पर्यावरणपूरक व वृक्षसंवर्धन संबंधीचे विचार व सवयी रुजविण्याच्या उद्देशाने सनदी अधिकारी विपुल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली 2017 पासून कामास सुरवात केली. इन्स्पायर फाउंडेशनच्या सदस्यांनी केवळ झाडे लावून वृक्षारोपणाची चळवळ केली नाही तर आपण लावलेली झाडे टिकावीत यासाठी ज्या परिसरामध्ये व ज्या गावांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम असतो त्या गावांमध्ये वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरणविषयक शास्त्रीय पद्धतीने माहिती सांगितली जाते. सध्या पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, पर्यावरण संवर्धनासाठी करावयाच्या उपाययोजना, पर्यावरणपूरक सवयी याविषयीची समग्र माहिती एलसीडी प्रोजेक्‍टरद्वारे इन्स्पायर फाउंडेशनच्या स्वयंसेवकांकडून दिली जाते. 

वृक्षारोपणाच्या अगोदर लोकांच्या मनामध्ये वृक्षारोपणासंबंधीचे विचार रुजविण्याचे काम हे फाउंडेशन करते व त्यानंतर वृक्षारोपणाचा व वृक्षसंवर्धनाचा कार्यक्रम लोकसहभागातून घेतला जातो. वृक्षारोपणासाठी लागणारी झाडेही फाउंडेशन पुरवते. फाउंडेशनचे स्वयंसेवक याबाबतीत लोकांमध्ये प्रबोधन करतात. मागील तीन वर्षांपासून इन्स्पायर फाउंडेशनने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व पर्यावरणपूरक विचारांची चळवळ सोलापूर जिल्ह्यात सुरू केली.

मागील दोन वर्षांत विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या मनामध्येही पर्यावरणपूरक सवयी निर्माण करण्याचे काम फाउंडेशनने केले आहे. या फाउंडेशनच्या कृतियुक्त चळवळीच्या उपक्रमाला सध्या तीन वर्षे पूर्ण झाली असून, या तीन वर्षात इन्स्पायर फाउंडेशनने माढा, केवड, जामगाव खैराव, धानोरे, मानेगाव, बुद्रूकवाडी, अंजनगाव खेलोबा, वडाचीवाडी, दारफळ, उंदरगाव, विठ्ठलवाडी, कुंभेज, तडवळे (महत), गुळपोळी, कोरफळे, बार्शी, रणदिवेवाडी, कळंबवाडी मालवंडी, श्रीपतपिंपरी, उपळाई बुद्रूक, मोहोळ, चिंचोली, कव्हे, सारोळे, सुर्डी या सोलापूर जिल्ह्यातील गावांसह हिंगोली जिल्ह्यातही वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व प्रबोधनाचे उपक्रम राबवले आहेत. सध्या या फाउंडेशनने लावलेली अनेक झाडे मोठी झाली असून फाउंडेशनतर्फे प्रबोधनाचे काम आपल्या शेकडो स्वयंसेवकांमार्फत हजारो लोकांपर्यंत व शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोचवले जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plantation of Inspire Foundation in Madha unique work of conservation