तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून एकीवर अत्याचार ! संशयिताला "अशी' केली पोलिसांनी बारा तासांत अटक

प्रमोद बोडके 
Monday, 11 January 2021

शनिवारी दुपारी या तिन्ही मुली रस्त्यावर खेळत होत्या. त्या वेळी एक तरुण आला. चॉकलेटचे आमिष दाखवून त्या तिन्ही मुलींना आपल्या दुचाकीवर बसवून घेऊन गेला. एका पडिक इमारतीमध्ये तो त्या तिघींना घेऊन गेला. त्या तीनपैकी एका मुलीवर त्याने अतिप्रसंग केला. त्यानंतर त्याने तिन्ही मुलींना घरी आणून सोडले. 

सोलापूर : चॉकलेटचे आमिष दाखवून एकाने तीन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न शनिवारी (ता. 9) केला होता. त्या तीन मुलींपैकी एका मुलीवर अत्याचार केला व त्या तिन्ही मुलींना त्याने घरी आणून सोडल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली. सीसीटीव्ही फुटेज आणि त्या मुलींनी दिलेल्या महितीवरून पोलिसांनी अवघ्या 12 तासांमध्ये त्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे मात्र सोलापुरात खळबळ उडाली आहे. 

पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट, पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश भंडारे, पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने, पोलिस अंमलदार दत्तात्रय कोळवले यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली. 

शनिवारी दुपारी या तिन्ही मुली रस्त्यावर खेळत होत्या. त्या वेळी एक तरुण आला. चॉकलेटचे आमिष दाखवून त्या तिन्ही मुलींना आपल्या दुचाकीवर बसवून घेऊन गेला. एका पडिक इमारतीमध्ये तो त्या तिघींना घेऊन गेला. त्या तीनपैकी एका मुलीवर त्याने अतिप्रसंग केला. त्यानंतर त्याने तिन्ही मुलींना घरी आणून सोडले. त्या तिन्ही मुलींनी आपल्या कुटुंबाला सर्व हकिकत सांगितली. यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठले. 

असे घेतले ताब्यात 
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि त्या तिन्ही मुलींनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्या मुलाच्या केलेल्या वर्णनामुळे पोलिसांना शोधकार्यात मदत झाली. संशयित आरोपी या परिसरात गेला होता, त्यावरून पोलिसांना संशय आला. तो त्याच परिसरात राहणारा असावा म्हणून पोलिसांनी पूर्ण लक्ष केंद्रित करून त्या परिसरात सर्व डीबी पथक तैनात केले. अवघ्या बारा तासांत रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested the accused who abducted and tortured the girls