esakal | भिवंडीहून कलबुर्गीकडे निघालेले टेम्पो मोहोळ पोलिसांनी पकडले 
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीहून कलबुर्गीकडे निघालेले टेम्पो मोहोळ पोलिसांनी पकडले 

जिल्हाबंदी असताना या प्रवाशांनी जिल्ह्यात प्रवेश केलाच कसा? यामुळे पोलिस यंत्रणेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे. दोन टेम्पोत मिळून 97 प्रवासी आहेत. यात 46 पुरुष, 38 महिला व 13 लहान मुलांचा समावेश आहे.

भिवंडीहून कलबुर्गीकडे निघालेले टेम्पो मोहोळ पोलिसांनी पकडले 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

करमाळा (सोलापूर) : भिवंडीहून कलबुर्गीकडे (कर्नाटक) 97 प्रवाशांनी भरलेले निघालेले दोन आयशर टेम्पो मोहोळ पोलिसांनी पकडले. हे टेम्पो नगर- करमाळा- टेंभुर्णीमार्गे पुढे आल्याने सर्व प्रवाशांना परत करमाळा येथे पाठवण्यात आले. सर्व प्रवाशांना करमाळ्यात क्वारंटाइन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

जिल्हाबंदी असताना या प्रवाशांनी जिल्ह्यात प्रवेश केलाच कसा? यामुळे पोलिस यंत्रणेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे. दोन टेम्पोत मिळून 97 प्रवासी आहेत. यात 46 पुरुष, 38 महिला व 13 लहान मुलांचा समावेश आहे. मात्र, या प्रवाशांना करमाळा येथे ठेवण्यास करमाळ्यातील नागरिकांचा तीव्र विरोध केला आहे. सोलापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण आहे. महाराष्ट्रात मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असून हे प्रवासी याच भागातून आल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी नऊ वाजता मोहोळ पोलिसांनी दोन आयशर टेम्पो अडवल्यानंतर त्याच्यात प्रवासी असल्याचे आढळून आले. यानंतर हे प्रवासी कोठून कोणत्यामार्गे आले याची चौकशी केल्यानंतर या टेम्पोच्या चालकांनी भिवंडी - नगर -करमाळामार्गे आल्याचे सांगितले. त्यांनी जातेगाव येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला असल्याचे सांगितले. यानंतर करमाळ्यातून दोन्ही टेम्पोने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केलाच कसा? त्यामुळे हे सर्व प्रवासी पुन्हा करमाळा येथे पाठवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घेतला असून त्यांची करमाळा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक आरोग्य तपासणी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यानंतर या सर्व प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात येणार आहे. 

86 प्रवाशांवर गुन्हे दाखल 
टेम्पोने प्रवास करणाऱ्या 48 पुरुष व 38 महिलांवर करमाळा पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिली. आम्ही नाकाबंदी केली आहे. हे टेम्पो नक्की करमाळा मार्गे गेले का? याची चौकशी सुरू आहे. टेम्पो चालक चुकीची माहिती देत आहेत. मोहोळ येथे पकडण्यात आलेल्या प्रवाशांना करमाळा येथे ठेवू नये, एकतर त्यांना त्याच्या गावी पाठवावे किंवा ते भिवंडीहून आले असल्याने त्यांना पुन्हा भिवंडी येथे पाठवावे, अशी मागणी करमाळ्यातील सर्व पक्षाच्या वतीने करण्यात आली. 

भिंवडीवरून आलेले प्रवाशी मोहोळवरून करमाळ्याला पाठवल्याचे समजले आहे. हे माझ्या परस्पर झाले आहे. आजची रात्र हे सर्व प्रवाशी करमाळा येथे राहील. तिथे त्यांच्या राहण्याची व जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या त्यांची व्यवस्था दुसरीकडे केली जाईल. 
-मिलिंद शंभरकर, 
जिल्हाधिकारी, सोलापूर 

टेंभूर्णीत प्रवाशी, पीकअप चालकांविरुद्ध गुन्हा 
टेंभुर्णी : कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परजिल्ह्यातून येणाऱ्या सर्व वाहनांना व लोकांना जिल्हाबंदी व संचारबंदीचा आदेश लागू केली असताना तीन बोलेरो पीकअप जीपमधून भिवंडी येथून लहान मुले, महिला व पुरूष अशा एकूण पन्नास जणांना घेऊन कर्नाटकातील शहापूर (जि. यादगिरी) येथे पोहच करण्यासाठी जात असताना टेंभुर्णी पोलिसांनी भीमानगर येथील तपासणी नाक्‍यावर पकडले. प्रवाशी व पीकअप चालकांविरुद्ध टेंभूर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भिवंडी येथून कर्नाटक राज्यातील शहापूर येथे जाण्यासाठी तीन पीकअप जीपमधून लहान मुले, महिला व पुरुष असे एकूण पंन्नास जण निघाले होते. पुणे- सोलापूर महामार्गावर हिंगणगाव पुलाजवळ असलेल्या पोलिसांच्या तपासणी नाक्‍यावर पीकअप जीप व त्यामधील प्रवाशांना पोलिसांनी पकडले. यानंतर पुणे- सोलापूर महामार्गावर गस्त घालणारे पोलिस नाईक दत्तात्रय गोसावी, पोलिस कॉन्स्टेबल बाळराजे घाडगे व चालक पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र खंडागळे यांना याविषयी माहिती कळविली. त्यांनी तपासणी नाक्‍यावर येऊन सर्वांना ताब्यात घेतले. नंतर टेंभूर्णी पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये भिवंडी येथून कर्नाटक राज्यातील शहापूर येथे पीकअप जीपने प्रत्येकी एक हजार रुपये भाडे देऊन निघाले होते.  

go to top