ट्रकसह माल पळविणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश 

toli.jpg
toli.jpg

सोलापूर: राष्ट्रीय महामार्गावर ट्रकसह कांद्याची पोती पळविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या टोळीकडून 475 पोती कांदा, ट्रक व इनोव्हा कार असा 43 लाख 82 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

कपिल राजू जाधव (वय 32, रा. अंबाबाई मंदीराजवळ, रामवाडी, सोलापूर), चंद्रकांत राजू जाधव (वय 27, रा. न्यु धोंडीबा वस्ती, रामवाडी, सोलापूर), नृसिंह उर्फ रॉक राजू सुबराव (वय 31, रा. धोंडीबा वस्ती, रामवाडी, सोलापूर), इजाज मकबूल खेड (वय 20, रा. चिराग अली तकीया, जोशी गल्ली, रविवार पेठ, सोलापूर), सद्दाम गफूर बागवान (वय 27, रा. मित्रनगर, शेळगी, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या पैकी काही संशयितांवर सोलापूर शहर पोलिस ठाण्यातदेखील गुन्हे दाखल आहेत. 
ट्रकचालक तय्यब लतीफ फुलारी (वय 27, रा. उमापूर, ता. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) हे त्याच्या ताब्यातील ट्रक (के ए 56 - 3633)मध्ये 25 टन कांदा घेऊन श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथून परतीपाडू (विशाखापट्टणम) येथे पोहोच करण्यासाठी सोलापूर-हैद्राबाद रोडने जात होते. ता.19 डिसेंबर रोजी बोरामणी गावाजवळ एक विना नंबरप्लेटची इनोव्हा कार ट्रकला ओव्हरटेक करून गेली व ती कार ट्रकच्या आडवी लावून कारमधील पाचपैकी चौघांनी खाली उतरून ट्रकचालक फुलारी व क्‍लिनरला मारहाण करून कांद्याच्या पोत्यांनी भरलेला ट्रक जबरदस्तीने चोरून नेला होता. याबाबत सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 
या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोलापूर शहरातील रामवाडी व रविवार पेठ भागातून पाच संशयितांना इनोव्हा कारसह ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांनी दरोडयाची कबुली दिली. पोलिसांनी या टोळीकडून चोरलेला 475 पोती कांदा, चोरलेला 12 चाकी ट्रक, गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार नं. एमएच 13 सीडी 3699 व त्यांचे वापरते मोबाईल असा 43 लाख 82 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

 
यांनी केली कामगिरी....... 
पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शाम बुवा, सहायक फौजदार ख्वाजा मुजावर, हवालदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, पोलिस शिपाई अक्षय दळवी, धनराज गायकवाड, रवि हाटकिळे, अन्वर अत्तार, राहूल सुरवसे, राजेंद्र गव्हेकर. 

मास्टर माईंड कपिल जाधवच....
संशयित आरोपींपैकी कपिल जाधव यास बेकायदेशीर रिव्हॉल्व्हर बाळगल्याप्रकरणी शहर पोलिसांनी अटक केली होती. कपिल जाधव याचा मोठा सावकारी व्यवसाय असून तोच या गुन्ह्याचा मास्टरमाईंड असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चंद्रकांत जाधव व रॉक सुबराव यांच्यावरही शहर पोलिसांकडे गुन्हे दाखल आहेत. सद्दाम बागवान हा यार्डातील कांद्याचा व्यापारी असून इजाज खेड हा चालक आहे. गुन्ह्यातील इनोव्हा कार ही कपिल जाधव याचीची असून चोरलेला ट्रक व कांदा हा कपिल जाधव याने त्याच्या घराजवळ आपल्या शेतातील कांदा असल्याचे सांगून आणून ठेवला होता. 19 डिसेंबर रोजी रात्री कपिल जाधव व सर्व संशयित हे मार्केट यार्डाजवळ सावज शोधत थांबले होते. ट्रकचालक फुलारी हा ट्रकमध्ये कांदा घेऊन पुणे-हैद्राबाद रोडने जात असताना मार्केट यार्डापासून संशयित आरोपींनी त्याचा पाठलाग करून बोरामणीजवळ गुन्हा केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com