मृताच्या शर्टवरून पोलिसांनी शोधले 24 तासात आरोपी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे सैपन ऊर्फ गुटल्या इमाम बोबडे (वय 22), अनिल शिवपुत्र लिंगशेट्टी (वय 22), वाघेश इरण्णा हणमशेट्टी (वय 30 सर्व रा.हिरोळीं तालुका आळंद, जिल्हा कलबुर्गी राज्य कर्नाटक), संजयकुमार हिरू राठोड (वय 27 रा. गांधीनगर तांडा, दुधनी ता.अक्कलकोट) अशी आहेत. 

अक्कलकोट :  कर्नाटकातील हिरोळी येथील 35 वर्षीय युवकाच्या खुनाचा शोध अवघ्या 24 तासात पोलिसांनी लावला असून चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. अक्कलकोट तालुक्‍यातील सांगवी जलाशयात एक मृतदेह सापडला होता. पाण्यातून मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला. त्याच्या शर्टवरून पोलिसांनी शोध लावून त्याचा पत्ता शोधून काढला. 

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे सैपन ऊर्फ गुटल्या इमाम बोबडे (वय 22), अनिल शिवपुत्र लिंगशेट्टी (वय 22), वाघेश इरण्णा हणमशेट्टी (वय 30 सर्व रा.हिरोळीं तालुका आळंद, जिल्हा कलबुर्गी राज्य कर्नाटक), संजयकुमार हिरू राठोड (वय 27 रा. गांधीनगर तांडा, दुधनी ता.अक्कलकोट) अशी आहेत. 
संशयितांना शोधण्यासाठी पोलिसांनी गोपनीय माहिती काढली. तसेच सायबर सेलच्या माध्यमातून तपास करून पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत चार संशयितांना अटक केली. प्रथम दुधनी गांधीनगर तांडा येथील एका संशयितास अटक केली व त्याच्याकडून इतर तीन आरोपींची माहिती मिळाली. कर्नाटक राज्यातील हिरोळी या गावातून उर्वरित तीन आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक करून अक्कलकोटला आणले. 

आळंद तालुक्‍यातील हिरोळी येथील युवक मल्लप्पा नागप्पा सुनगार (वय 35) याचा खून करून त्याचा मृतदेह पोत्यात बांधून अक्कलकोट तालुक्‍यातील सांगवी जलाशयात टाकण्यात आलेला होता. पाण्यातून मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला. त्याच्या शर्टवरून पोलिसांनी शोध लावून त्याचा पत्ता शोधून काढला. यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नाळे, हेडकॉन्स्टेबल अंगद गीते, युसुफ शेख,महेश कुंभार, प्रवीण वाळके, बिपिन सुरवसे, बशीर शेख यांनी प्रयत्न केले. या खुनाची फिर्याद मयताचा मोठा भाऊ शहाणप्पा नागप्पा सूनगार रा. हिरोली ता.आळंद यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली होती. हा खून कसा व कुठे केला, वाहने कोणती वापरली याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. ही कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अंगद गीते, पोलिस हेडकॉन्स्टेबल यमाजी चव्हाण, पोलिस नाईक प्रवीण वाळके, पोलिस नाईक धनु राठोड, हवालदार मनोज भंडारी व सायबर सेलचे कॉन्स्टेबल रवी हातकिले यांनी पार पाडली. 

संपादन : अरविंद मोटे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police found the accused within 24 hours from the deceased's shirt