"यापुढे पोलिस, ग्रामपंचायत व महसूल प्रशासन राबवणार मुजोर वाळू तस्करांविरुद्ध संयुक्त मोहीम'

दत्तात्रय कडबाने 
Friday, 5 March 2021

महसूल विभागातर्फे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई सुरूच असून, नदीकाठच्या ग्रामपंचायतींच्या सरपंच व नूतन सदस्यांची लवकरच एक कार्यशाळाही घेण्यात येणार आहे. अवैध वाळू उपसा विरोधात पोलिस, ग्रामपंचायत व महसूल प्रशासन समन्वय राखून मोहीम राबविणार असल्याची माहिती तहसीलदार अभिजित सावर्डे-पाटील यांनी दिली. 

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यात महसूल विभागातर्फे अवैध वाळू उपसा, वाहतुकीसाठी दंड केलेल्या परंतु दंडाची रक्कम न भरलेल्या 187 थकबाकी असणाऱ्यांच्या सात-बारावर बोजा चढविण्यात आला आहे. महसूल विभागातर्फे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई सुरूच असून, नदीकाठच्या ग्रामपंचायतींच्या सरपंच व नूतन सदस्यांची लवकरच एक कार्यशाळाही घेण्यात येणार आहे. अवैध वाळू उपसा विरोधात पोलिस, ग्रामपंचायत व महसूल प्रशासन समन्वय राखून मोहीम राबविणार असल्याची माहिती तहसीलदार अभिजित सावर्डे-पाटील यांनी दिली. 

सांगोला तालुक्‍यातील अवैध वाळू उपसा विरोधात "सकाळ'ने गुरुवारी (ता. 4) "वाळू चोरी जोमात, प्रशासन कोमात' या आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती. तालुक्‍यातील अवैध वाळू उपशासंबंधी "सकाळ'शी बोलताना तहसीलदार अभिजित सावर्डे-पाटील यांनी सांगितले की, तालुक्‍यात 2016 पासून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात सुमारे दीड कोटी रुपयांचा दंड केला होता. यातील फक्त 50 लाख रुपये वसूल झाले असून उर्वरित सुमारे एक कोटी रुपये दंडाची रक्कम वसुली होणे बाकी आहे. दंडाची वसुली न झाल्यामुळे अशा 187 थकबाकीदारांच्या सात-बारावर बोजा चढविण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात अवैध वाळू उपसाप्रकरणी 16 वाहनांवर कारवाई करून दोन गुन्हे दाखल केले आहेत. तर चालू मार्च महिन्यात आतापर्यंत चार वाहनांवर कारवाई करून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

2013 च्या वाळू धोरणानुसार वाळू उत्खनन रोखण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाबरोबरच ग्रामपंचायत व सदस्यांचीही आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची लवकरच अवैध वाळू उपसा प्रकरणी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनाही सविस्तर माहिती दिली जाईल. 

वाळूबरोबरच इतर अनेक विषय महत्त्वाचे 
अवैध वाळू उपसा विरोधात महसूल प्रशासन योग्य ती कारवाई करीतच आहे. परंतु, वाळू प्रकरणाबरोबरच इतरही सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. महसूल प्रशासनाला या विषयांकडेही लक्ष द्यावे लागत आहे. परंतु यामुळे अवैध वाळू उपशाकडे दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. 
- अभिजित सावर्डे-पाटील, 
तहसीलदार, सांगोला 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Gram Panchayat and Revenue Administration will now launch a joint operation against sand mafias