सांगोला तालुक्‍यात बैल-घोडागाडी शर्यत सुरू होण्यापूर्वीच पोलिसांचा छापा 

दत्तात्रय खंडागळे 
Sunday, 18 October 2020

राजुरी पठारावर बैल-घोडा बैलगाड्यांची शर्यत होणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दोन बैल व घोडा गाड्या शर्यतीसाठी तयारीत होत्या. शर्यत सुरु होणार तेवढ्यात पोलिस पोहोचल्याने शर्यतीचे आयोजन करणारे पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून तीन जणांना पकडले. 

सांगोला (सोलापूर) : सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असतानाही बेकायदेशीररित्या बैल-घोडागाडीच्या शर्यतीचे आयोजन करणाऱ्या मनोहर उर्फ मनोज रमेश व्हरगर, बापू उर्फ हरिबा महादेव व्हरगर, नवनाथ बापू दबडे, शिवाजी कोंडीबा दबडे, संभाजी कोंडीबा दबडे (सर्व रा. राजुरी, ता. सांगोला) या पाच जणांविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सांगोला पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक नागेश निंबाळकर, सहाय्यक पोलिस फौजदार मुजावर, पोलिस हेडकॉन्स्टेबल हजरत पठाण, पोलिस नाईक संजय चंदनशिवे, पोलिस कॉन्स्टेबल देशमुख हे नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना जवळा ते हातिद रोडवरील राजुरी पठारावर बैल-घोडा बैलगाड्यांची शर्यत होणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दोन बैल व घोडा गाड्या शर्यतीसाठी तयारीत होत्या. शर्यत सुरु होणार तेवढ्यात पोलिस पोहोचल्याने शर्यतीचे आयोजन करणारे पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून मनोहर उर्फ मनोज रमेश व्हरगर, बापू उर्फ हरिबा महादेव व्हरगर, नवनाथ बापू दबडे (सर्व रा. राजुरी, ता. सांगोला) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पळून गेलेल्या व्यक्तीबाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे शिवाजी कोंडीबा दबडे, संभाजी कोंडीबा दबडे (दोघेही रा. राजुरी, ता. सांगोला) असे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आम्ही सर्वजण मिळून बैल-घोडा गाडी शर्यत लावण्यासाठी थांबलो होतो असे सांगितले. याबाबत पोलिस नाईक नागेश निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.द.वि. 143, 188 269, 270 तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (1)(अ), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब), महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 चे कलम 37 (3), 135, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम सन 1897 चे कलम 2, 3, 4 अन्वये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police raid in Sangola taluka before the start of bullock race